मी योग्य वेळी बोलेन - चंद्रकांत खैरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

सभागृह नेतेपदाबाबत पक्षप्रमुख घेणार निर्णय 
महापालिकेतील सभागृह नेते, गटनेता बदलण्याबाबत शिवसेना निर्णय घेणार आहे का? अशी विचारणा केली असता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. येत्या आठ-दहा दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांना काम करण्यासाठी वेळ कमी आहे, असेही श्री. खैरे यांनी नमूद केले.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत योग्य वेळी मी बोलेल; मात्र शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकावत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रचंड काम करणार आहे, महापालिकेत माझी लुडबूड नसते, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (ता. चार) केला.

महापालिकेत पत्रकारांसोबत बोलताना श्री. खैरे म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे शिवसेनेचा भगवा कायम फडकत होता. खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता खैरे पुढे म्हणाले, की कोणी तरी धमकी दिली आहे, जिल्ह्यावर वेगळा झेंडा फडकवू; मात्र आता प्रचंड काम करू.

लोकसभा निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाहीत का? असा प्रश्‍न केला असता, या विषयावर इथे बोलणे योग्य नाही. आज युतीला सभापतिपद मिळाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी आलोय. योग्य वेळी मी बोलेल. माझी महापालिकेत कधीच लुडबूड नसते, हे तुम्ही लक्षात घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Khaire Politics