माझे काय चुकले? - चंद्रकांत खैरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

खैरे नव्हे, हिंदुत्व हरले - एकनाथ िशंदे
पालकमंत्री शिंदे म्हणाले, की या निवडणुकीत शिवसेनेच्या १८ खासदारांचा गड आला; मात्र चंद्रकांत खैरे यांच्यासारखा सिंह हरल्याचे शिवसेना पक्षप्रमुखांनाही दुःख आहे. कदाचित आपली काही गणितं चुकली असतील. इथे खैरे हरले नाहीत, तर शिवसैनिक आणि हिंदुत्व हरले असल्याची खंत आहे. श्री. खैरे यांच्या पराभवाचे दुःख सर्वांनाच आहे. मनाला वेदना देणारी खूप मोठी जखम आहे. या जखमेचा वचपा काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा सर्वांनी निर्धार करावा. या निवडणुकीत काही चुका झाल्या असतील; मात्र यापुढे त्यांची पुनरावृत्ती व्हायला नको, असा यानिमित्ताने सर्वांनी संकल्प करूया. यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहायला तयार राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी हाकही दिली. 

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, संपर्कनेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, मनीषा कायंदे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, राजेंद्र जंजाळ, देवयानी डोणगावकर, त्र्यंबक तुपे, ऋषिकेश खैरे, राजू वैद्य, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 

श्री. खैरे म्हणाले, ‘‘माझा पराभव झाला याचे दुःख नाही; पण हिंदुत्व हरले याचे वाईट वाटते. ही माझी शेवटची निवडणूक होती. माझा पराभव करून कुणाला फायदा झाला आहे, याचा विचार करावा. जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेची ताकद आणि वैभव आणायचे असेल तर मतभेद, गटबाजी बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची गरज आहे. ज्याने स्वत:च्या आई-वडिलांचा मान ठेवला नाही त्यांना ज्यांनी मदत केली, त्याच्या ट्रॅक्‍टरमध्ये बसून माझ्याविरोधात काम केले असले तरी आता लोकसभा निवडणुकीत काय झाले, कुणी विरोधात काम केले, हे विसरून माझ्याविरोधात काम करणाऱ्यांनाही मी माफ केले, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांना धान्य व पाण्याच्या टाक्‍या वाटप करण्यात आल्या. तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विश्‍वनाथ स्वामी यांनी, तर आभार अंबादास दानवे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Khaire Talking Politics