यंदापासून अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून इयत्ता अकरावी व त्यानंतर वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे.

औरंगाबाद - शैक्षणिक वर्ष 2019- 20 पासून इयत्ता अकरावी व त्यानंतर वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. प्रचलित नियमानुसार अकरावी व बारावी गुणदान पद्धत 80- 20 व 70-30 अशी होती; मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर आता अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. दहावीच्या अभ्यासक्रम परीक्षा आणि परीक्षा पद्धतीप्रमाणेच अकरावी व बारावी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष परीक्षा बंद करून तोंडी परीक्षांनाही पूर्णविराम दिला जाणार आहे. याच धर्तीवर नव्या शैक्षणिक वर्षांपासून अकरावीची पुस्तके बदलणार आहेत. 

गणित विषयाबाबत संभ्रम 
गणित या विषयाचा पेपर शंभर गुणांचा घेण्याबाबत गणितविषयक शिक्षक मंडळाकडून विरोध करण्यात आला आहे. गणित याविषयासाठी गुणांची गोळाबेरीज करण्यासाठी वीस गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ठेवण्यात यावेत, अशी मागणी या मंडळाकडून करण्यात आली. अकरावी अभ्यासक्रम बदलासंदर्भात चार मे रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in the course of the eleventh this year