सरकार बदलल्यामुळे ठेकेदारांमध्ये चलबिचल! नव्या सरकारच्या निर्णयांकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

development work

मंत्रिमंडळाचे खाते वाटप अजूनही झाले नाही. दरम्यान, सरकार बदलल्याने बऱ्याच विकासकामांच्या फाइल सध्या तरी ‘जैसे थ्या’ आहेत.

सरकार बदलल्यामुळे ठेकेदारांमध्ये चलबिचल! नव्या सरकारच्या निर्णयांकडे लक्ष

- मोबीन खान

वैजापूर - तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे मंजूर असून, पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये अजून काही कामे मंजूर होतील, या आशेवर ठेकेदारांनी कामे मिळविण्याची फिल्डिंग लावली होती. जिल्हा नियोजनमध्येही अनेक कामे मंजूर झाली आहेत. परंतु, आता महाविकास आघाडी सरकार गेले असून, नवीन सरकारने जिल्हा नियोजनची मंजूर कामे रद्द करण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे ठेकेदारांमध्ये चलबिचल झाली आहे.

मंत्रिमंडळाचे खाते वाटप अजूनही झाले नाही. दरम्यान, सरकार बदलल्याने बऱ्याच विकासकामांच्या फाइल सध्या तरी ‘जैसे थ्या’ आहेत. त्यामुळे सरकार नवे कोणते निर्णय घेणार? याकडे तालुक्यातील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत वैजापूर तालुक्यात विविध विकासकामांची करोडो रुपयांची घोषणा करण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली. काहींना मंजुरी, तर काही अर्धवट आहेत. काही प्रकल्पांना निधी मंजूर झाला. परंतु, प्रत्यक्षात कामे सुरू झाली नाहीत. दोन वर्षे कोरोनातच गेल्याने बराच निधी आरोग्य विभागाकडे वळविण्यात आला. परिणामी, आरोग्य सुविधांची पायाभूत कामे पूर्ण झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या वाढली. मात्र, मनुष्यबळाचा प्रश्न अजूनही सुटला नाही.

आकृतिबंधानुसार हजारो पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील पुरेसा औषधीसाठा पुरविण्याचा प्रश्नही कायम आहे. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज देण्यात हात आखडता घेतला. पीक कर्जाची बरीच प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनेच कर्ज वाटपात आघाडी घेतली. परंतु, कर्ज वाटपाची उदिष्ट पूर्ती होऊ शकली नाही. बँकिंग व सहकार क्षेत्रातही काही नवे आदेश धडकण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांच्या नजरा सरकारच्या निर्णयांकडे लागल्या आहेत.

विकासासाठीच आम्ही सत्ताबदल केली आहे. या आठवड्यातच शहराच्या विकासासाठी २० कोटी रुपयांची पहिली आॅर्डर निघणार आहे. तसेच ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला लवकरच तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. आमच्या हक्काचा मुख्यमंत्री मिळाल्याने आता अडीच वर्षांत तालुक्यातील चौपट विकासकामे मी करणार आहे.

- रमेश बोरणारे, आमदार

मिनी मंत्रालयातही ‘वेट ॲण्ड वॉच’

पंचायत समिती व ग्रामपंचायतींबाबत महाविकास आघाडीने घेतलेले अनेक निर्णय सरकार कोसळल्याने गुंडाळल्या जातील. त्याचे साधक-बाधक परिणाम तालुक्यावरही होणार आहेत. अचानक सरकार बदलल्याने काहींना निधी मिळणार, तर काही प्रकल्पांना कात्री लागण्याची शक्यता अधिकारी बोलवून दाखवीत आहेत. असा प्रकार सर्वच विभागामध्ये घडत आहे. आधीच्या काही योजना व धोरणांबाबत नवीन आदेश येईपर्यंत तालुक्यातील अधिकारी ‘वेट ॲण्ड वॉच’च्या स्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Changes In Government Change In Contractors Attention Decisions Of New Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top