अखेर मुख्य अभियंत्यांची बदली रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

औरंगाबाद - परिमंडळात विक्रमी वसुली करणाऱ्या मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची अचानक करण्यात आलेली बदली ग्राहकांच्या दबाव आणि"सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला रद्द करावी लागली. मंगळवारी (ता. सात) सायंकाळी साडेसहा वाजता बदली रद्दचे पत्र महावितरणला मिळाले. या निर्णयामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी, वीज संघटनांच्या कृती समितीनेही आनंद व्यक्‍त केला आहे.

औरंगाबाद - परिमंडळात विक्रमी वसुली करणाऱ्या मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची अचानक करण्यात आलेली बदली ग्राहकांच्या दबाव आणि"सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला रद्द करावी लागली. मंगळवारी (ता. सात) सायंकाळी साडेसहा वाजता बदली रद्दचे पत्र महावितरणला मिळाले. या निर्णयामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी, वीज संघटनांच्या कृती समितीनेही आनंद व्यक्‍त केला आहे.

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदाची सूत्रे हाती घेताच वसुलीची धडाकेबाज मोहीम राबवीत वीजगळतीचे प्रमाण कमी करणारे सुरेश गणेशकरांची एक मार्चला नांदेडला बदली करण्यात आली होती. गणेशकर यांनी महापालिकेकडील कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यासाठी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. एवढेच नव्हे तर एक ते 28 फेब्रुवारीदरम्यान थकबाकीदारांच्या विरोधात धडक कारवाई करीत 224 कोटी रुपये वसूल केले. महापालिकेच्या पथदिव्यांची वीज बंद झाल्याने पालिकेची राज्यभर नाचक्की झाली. गणेशकर यांचा धडाकेबाजपणा अनेकांना अडथळा ठरत असल्यामुळे त्यांची अचानक बदली करण्यात आली होती.

बदली थांबविण्यासाठी संघटनांनीही होत्या आग्रही
औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची नांदेड येथे अचानक करण्यात आलेली बदली अन्यायकारक आहे. ती रद्द करण्यात यावी, यासाठी महावितरणच्या सर्व संघटना एकवटल्या होत्या.

संघटनांनी स्थापन केलेल्या कृती समितीने ऊर्जामंत्री तसेच व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवदेन दिले होते. संघटनांची एकजूट आणि "सकाळ'ने लावलेल्या मालिकांमुळे अखेर प्रशासनाला ही बदली रद्द करावी. या कृती समितीमध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिक वर्कर्स, फेडरेशन, सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, अधिकारी संघटना, भारतीय कामगार सेना, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, कार्यालयीन कर्मचारी संघटना यांचा समावेश होता.

"सकाळ'ने केला पाठपुरावा
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या अचानक करण्यात आलेल्या बदलीचा विषय "सकाळ'ने लावून धरला. त्यांच्यामुळे औरंगाबाद परिमंडळाला झालेला फायदा, याची दखल घेत वरिष्ठांनी ही बदली रद्द करीत त्यांना औरंगाबाद परिमंडळात कायम केले.

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यशैलीमुळे सर्वजण जोशात काम करत होते. त्यात अचानक झालेल्या बदलीमुळे नाराजी होती. सर्वांनी ही बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर प्रशासनाने ही बदली रद्द करून गणेशकरांवर विश्‍वास दाखविला. या विश्‍वासाला तडा न जाऊ देता उत्कृष्ट काम करण्यासाठी आम्ही मुख्य अभियंता यांच्यासोबत राहणार आहेत.
-अरुण पिवळ, कृती समिती समन्वयक

Web Title: cheap engineer transfer cancel