तीन परीक्षेला मुकणार ३२१ विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

पोलिसांत गुन्हा दाखल करा
या प्रकरणात केंद्रसंचालक बी. एन. कोठावदे व गणित विषयाचे शिक्षक प्रदीप महालपुरे व संदीप महालपुरे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असे आदेश बोर्डाकडून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहेत; तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या १३ पर्यवेक्षकांवर कार्यवाही करावी, असे पत्र मंडळातर्फे संबंधित संस्थेला देण्यात आले आहे.

औरंगाबाद - गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेतील बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेला भरारी पथकाने भेट दिल्यानंतर सामुदायिक कॉपी प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील ३२१ दोषी विद्यार्थ्यांना बोर्डाकडून वन प्लस टू म्हणजे तीन परीक्षांसाठी डीबार केले. तर दोषी तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत शनिवारी (ता. सहा) बोर्डाच्या समितीमार्फत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांना अहवाल देण्यात आला. 

गोंदेगाव केंद्रावरील गैरप्रकाराविषयी भरारी पथकाने मंडळास अहवाल सादर करून चौकशीची मागणी केली होती. यासाठी बोर्डाकडून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दोन ते २० मेदरम्यान प्रकरणाची चौकशी करून बोर्डाकडे अहवाल सादर केला होता. 

या अहवालानुसार या गैरप्रकारास केंद्रसंचालक बी. एन. कोठावदे; तसेच गणित शिक्षक प्रदीप महालपुरे व संदीप महालपुरे यांनी संगनमताने बीजगणित या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी कर्त्यव्यात कसूर करून परीक्षाकामी गैरप्रकार केल्याचे नमूद करण्यात आले होते.

बारावीतील दोषींवरही कारवाई 
केंद्रावर परीक्षार्थी असलेल्या ३२१ विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळातर्फे वन प्लस टू असे डीबार करण्यात आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी मार्च २०१९, जुलै २०२० व मार्च २०२० या तीन परीक्षांना मुकणार आहेत. यासह बारावीच्या परीक्षेतील दोषी ४३ परीक्षार्थींनादेखील दोन प्लस एक असे डीबार करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheat Case Exam Student Crime