शिक्षकांनीच पुरविल्या कॉप्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी) मंगळवारी (ता. सात) दहावीच्या परीक्षेस सुरवात झाली. मराठी या भाषा विषयाच्या पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्रावर चक्क शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविल्याचा प्रकार लाडसावंगी येथे उघडकीस आला.

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी) मंगळवारी (ता. सात) दहावीच्या परीक्षेस सुरवात झाली. मराठी या भाषा विषयाच्या पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्रावर चक्क शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविल्याचा प्रकार लाडसावंगी येथे उघडकीस आला.

जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, लाडसावंगी येथील परीक्षा केंद्रावर चारशेच्या वर परीक्षार्थी होते. यावेळी जमिनीवर बसून परीक्षा देणारे विद्यार्थी चक्क सामुदायिक कॉपी करून पेपर सोडविताना आढळून आले. इतकेच नव्हे; तर हॉलमध्ये असलेल्या पर्यवेक्षकांनीच विद्यार्थ्यांना सामुदायिक कॉप्या पुरविल्याचे दिसून आले. गाइड, डायमंड नोट्‌स, चिठ्ठ्या, अपेक्षित आदी प्रकारच्या कॉप्या सर्रास केल्या जात होत्या. पर्यवेक्षकांनी परीक्षार्थ्यांना घोळका करून बसविले आणि सामुदायिक उत्तराचे वाचन केले जात होते. विद्यार्थीही एकमेकांचे पेपर बघून लिहिताना आढळले. तसेच विद्यार्थ्यांना जमिनीवर न बसविण्याचा नियम असतानाही या केंद्रावर साधारण तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर द्यावे लागले. परीक्षा केंद्राच्या खिडक्‍यांत कॉप्यांचा खच साचला होता. यावेळी परीक्षा केंद्रावर बैठे पथकच नसल्याचे दिसून आले.

सर... पाचव्या प्रश्‍नाचे उत्तर आणले का ?
जिल्हा परिषदेच्या लाडसावंगी केंद्रावरील एका हॉलमध्ये "सकाळ'चे बातमीदार गेले. दरम्यान, आत विद्यार्थ्यांचा घोळका करून सामुदायिकपणे उत्तरे सांगणाऱ्या शिक्षिकेने बातमीदारालाच स्टाफ शिक्षक समजत "सर, पाचव्या प्रश्‍नाचे उत्तर आणले का?' अशी विचारणा केली; परंतु ही व्यक्ती आपल्यापैकी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांना कॉप्या खिडकीतून बाहेर टाकावयास सांगून आपापल्या जागी बसण्याची सूचना केली.

मोबाईलच्या नियमाला तिलांजली
बारावीच्या परीक्षेत मुंबई, लातूर येथील पेपरफुटी आणि पेपर सुरू होण्याआधी व्हॉटस्‌ऍप प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्‍वभूमीवर बोर्डातर्फे सतर्कता बाळगण्यासाठी केंद्रसंचालक आणि कस्टोडियन यांच्याशिवाय कोणालाही मोबाईल वापरता येणार नसल्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र, या आदेशाला अनेक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी ठेंगा दिल्याचे आढळून आले. औरंगाबादेतील मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळून आला.

Web Title: cheat supply by teacher