दहाची पाणी बॉटल ४० ला दिली; आता १८ हजार रुपये द्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - पिण्याच्या पाण्याची दहा रुपयांची बाटली ४० रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आयनॉक्‍स चित्रपटगृह व कोका कोला या कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला. ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी पाच हजार रुपये, तक्रार खर्चापोटी तीन हजार रुपये, तसेच लीगल अँड सर्व्हिस शाखेत दहा हजार असे १८ हजार रुपये जमा करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. 

ॲड. अतुल हावळे पाटील, ॲड. योगेश बोबडे आणि ॲड. आशिष शिंदे हे पाच मार्च २०१७ ला गारखेडा भागातील ‘आयनॉक्‍स’मध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली नेली होती; मात्र सुरक्षेच्या कारणावरून त्यांना पाण्याची बाटली आत नेण्यास मज्जाव करण्यात आला.

मध्यंतरानंतर त्यांनी कोका कोला कंपनीची ‘किन्ले’ ही पाण्याची बाटली खरेदी केली. दहा रुपये मूळ किंमत असणाऱ्या या बाटलीसाठी त्यांना तब्बल ४० रुपये आकारण्यात आले. याविषयी त्यांनी हरकत नोंदविल्यानंतर बाटलीवर छापील किमतीनुसार रक्कम आकारण्यात येत असल्याचे कारण त्यांना देण्यात आले. या लुटीविरोधात तीनही वकिलांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. सुनावणीअंती मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले. एका महिन्यात आदेशाचे पालन न केल्यास नऊ टक्के व्याजासह ही रक्कम द्यावी लागेल, असेही निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

या ठिकाणी करा तक्रार
शहरातील सर्वच मल्टीप्लेक्‍समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणि पाणी बॉटल आतमध्ये नेऊ दिली जात नाही. त्यामुळे प्रेक्षकांना त्या ठिकाणी असलेल्या दुप्पट-तिप्पट दरानेच खाद्यपदार्थ आणि पाणी बॉटलची खरेदी करावी लागते. असा अनुभव तुम्हाला आला असेल; तर तेथील प्रिंटेड बिल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे (डीएसओ) याबाबत रीतसर तक्रार नोंदवू शकता. तिथे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर ग्राहक मंचाकडे प्रेक्षक दाद मागू शकतात.

Web Title: cheating water bottle 40 rupees fine 18000 rupees crime