अपंगशाळा, वसतिगृह व आश्रमशाळांची झाडाझडती

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर: जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध ठिकाणी असलेल्या शाळा, वसतिगृह व आश्रमशाळांची बुधवारी (ता. 21) एकाच दिवशी झाडाझडती घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 44 भरारी पथकांनी ही मोहीम पार पाडली. एकाच दिवशी जिल्ह्यातील 182 शाळा व वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत तपासणीचे काम सुरू होते. डॉ. ईटनकर यांनी अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे खळबळ उडाली. भरारी पथकांना अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या असून, संस्थाचालकांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. 


जिल्ह्यात अपंग कल्याण आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली मतिमंद, अस्थिव्यंग, मूकबधिर आदी विविध प्रकारच्या अपंग शाळा सुरू आहेत. यासोबत अपंगांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांची संख्याही मोठी आहे. सर्व शाळा व वसतिगृहांना सरकारच्या वतीने प्रतिविद्यार्थी अनुदान देण्यात येते. यासोबत शाळा व वसतिगृहात काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतनही देण्यात येते. मागील काही काळात शाळा व वसतिगृहांची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी तर अचानकच या शाळांचा उदय झाल्याची चर्चा घडून आली. आजपर्यंत नव्हती आणि अचानक कुठून आली, अशा प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. या शाळा व वसतिगृहात सरकारच्या नियमानुसार विविध सोयी व सुविधा आवश्‍यक आहेत. काही शाळा व वसतिगृहात सोयी व सुविधा न देताच अनुदान लाटले जात आहे. यातूनच अपंग कल्याण आयुक्तांनी शाळा व वसतिगृहांची अचानक तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले होते.

गोपनीय आलेल्या या आदेशाची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ईटनकर यांनी तपासणीचे कुशल नियोजन केले. विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 44 भरारी पथकांची नियुक्ती केली. पथकात कनिष्ठ अधिकारी व लिपिकांचा समावेश होता. त्रिसदस्यीय पथकांना सकाळी सात वाजता जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले. त्यांना ऐनवेळी तपासणीच्या शाळा व वसतिगृहांची यादी देण्यात आली. एकाच मार्गावरील शाळा व वसतिगृहांची जबाबदारी पथकांना देण्यात आली होती. सकाळपासून शाळा व वसतिगृहांची अचानक तपासणी सुरू झाली. तपासणीचे वृत्त वाऱ्यासारखे जिल्हाभरात पसरले. कारवाईमुळे शाळा व वसतिगृहांचे संस्थाचालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. 

विविध 40 मुद्यांवर तपासणी 

शाळा व वसतिगृहांची बुधवारी विविध चाळीस मुद्यांवर तपासणी करण्यात आली. यात विद्यार्थी संचमान्यता, पटसंख्या, उपस्थित विद्यार्थी संख्या, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक प्रगती, आरोग्यविषयक प्रगती, स्वच्छतागृह, आरोग्य व सुरक्षिततेच्या विविध सुविधा, उपाययोजना आदी विषयांवर तपासणी करण्यात आली. अनेक ठिकाणी या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगताना संस्थाचालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांची कसरत झाली. 

अशी झाली तपासणी 
अनुदानित वसतिगृह - 110 
 आश्रमशाळा - 5 
अपंगशाळा - 67 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com