सावधान! तुमच्या घरी येणाऱ्या दुधात भेसळ तर नाही ना?

प्रकाश बनकर
रविवार, 29 सप्टेंबर 2019

आवडत्या खाद्यपदार्थांत होणाऱ्या भेसळीचे प्रकार वाढत आहेत. त्यात दूधही अपवाद राहिलेले नाही. कारण दुधात केवळ पाण्याची भेसळ होते असे सर्वसामन्यांना वाटते. खरे तर दुधात भेसळ करण्यासाठी सोडा, साखर, मीठ यांसह केमिकल आणि पाम ऑईलचाही वापर होतो.

औरंगाबाद : आवडत्या खाद्यपदार्थांत होणाऱ्या भेसळीचे प्रकार वाढत आहेत. त्यात दूधही अपवाद राहिलेले नाही. कारण दुधात केवळ पाण्याची भेसळ होते असे सर्वसामन्यांना वाटते. खरे तर दुधात भेसळ करण्यासाठी सोडा, साखर, मीठ यांसह केमिकल आणि पाम ऑईलचाही वापर होतो. यामुळे आपल्याकडे येणारे दूध भेसळयुक्‍त नाही ना? याची खात्री कराच. 

शहरात नियमित रोज दोन ते अडीच लाख लिटर दूध लागते. जीवनघटकात दुधाचे सेवन महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्‍तीला दिवसभरात 300 एमएल दूध घेणे गरजेचे आहे. मात्र, 24 तासांत केवळ 50 एमएलच्या पुढे सरासरी दुधाचे सेवन होते. दुधात भेसळीचे प्रकार होत आहेत. ही भेसळ रोखणसाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने हे प्रकार होत आहे.

भेसळीचे प्रकार हे साधारणता सुटे दूध विक्रेत्यांकडून होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पॅकबंद दूध विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषधी प्रशासनाचे लक्ष असते. त्यांच्या देखरेखीखाली हे पॅकबंद दूध विक्रेते आपला व्यवसाय करीत असतात. यामुळे ज्यांच्यावर नियंत्रण नाही, त्यांच्याकडून हा प्रकार होत आहे. भेसळयुक्‍त दुधाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यात प्रामुख्याने त्वचारोग, रक्‍तदाब वाढण्याची शक्‍यता असते. 
 
कसे ओळखाल? 

दुधातील भेसळ ओळखणे सोपे नाही. मात्र, भेसळयुक्‍त दुधाची चव आणि त्यानंतर केमिकल दुधात टाकले असेल, तर दूध गरम करताना फेस येतो. चव बदललेले दूध आणि तापल्यावर येणारा दुधाला फेस हा भेसळयुक्‍त दुधाचा प्रकार असतो, असे देवगिरी महानंद दूध संघाचे व्यवस्थापक पी. बी. पाटील यांनी सांगितले. 

 

दुधात भेसळीचे अनेक प्रकार आहे. यात प्रमुख्याने साखर, मीठ, पीठ, केमिकल, पामतेलचा वापर हा फॅट वाढविण्यासाठी होतो. या प्रकारामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्याकडे खुल्या माध्यमातून येणाऱ्या दुधाची आधी चव बघावी; तसेच दूध तापायला ठेवल्यानंतर फेस आल्यास त्यात भेसळ आहे, हे समजावे. 
- पी. बी. पाटील, महाव्यवस्थापक, महानंद दूध, औरंगाबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemicals, including soda, sugar, salt, to dissolve in milk