मुख्यमंत्र्यांनी "क्‍लीन चिट' देण्याचा धंदा बंद करावा - नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

औरंगाबाद - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे "वाळूमाफियांचे ट्रक सोडा', असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना "क्‍लीन चिट' देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद करावेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील मातंग समाजाच्या मुलांना मारहाणप्रकरणी सोमवारी भेट दिल्यानंतर मलिक येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबावर दबाव आणला. "केस मागे घे; अन्यथा तुझ्यावरच चोरीचे गुन्हे दाखल करू', अशी धमकी महाजन यांची माणसे देत होती. विशेष म्हणजे तक्रारदारांचे अपहरणही करण्यात आले होते. मुळात गंभीर घटना असतानाही पीडितांनाच धमक्‍या देणे, हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, मंत्री महाजन यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणीही त्यांनी केली. दोषींवर कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात वाळूसह अन्य माफियांचे फावत आहे. वाळूचे ट्रक सोडण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांच्या कार्यालयातूनच फोन केले जात आहेत. जळगावात ड्रग्जमाफियाकडून संरक्षणासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दहा लाख रुपये घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गुटखामाफियांना सोडा म्हणत पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही मलिक यांनी या वेळी केला.

Web Title: chief minister clean chit nawab malik politics