'मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला नाही'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

आरक्षणासाठी लिंगायत समाजातर्फे लातूरात धरणे आंदोलन

लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देऊ, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला होता. मात्र, अधिवेशनाच्या काळात लिंगायत आरक्षणाबद्दल एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी उच्चारला नाही आणि समाजाला दिलासा देणारे जाहीर वक्तव्यही केले नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला नसल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. याचा परिणाम आगामी निवडणूकीच्या निकालावर होईल, असा इशारा लिंगायत बांधवांनी शनिवारी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले,  आम्हाला आरक्षण कधी, असा सवाल उपस्थित करत लिंगायत आरक्षण कृती समितीने आणि लिंगायत समासंघाने लातूरातील तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी पाठींबा दर्शवला. शिवाय, विविध समाजातील नागरिकांनी आंदोलनात सहभागी होऊन लिंगायत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. लिंगायत आरक्षण मिळालेच पाहीजे, अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

समितीचे प्रमुख सुदर्शन बिरादार म्हणाले, सरकारने लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण लागू करावे. वाणी नावाला असलेले ओबसीचे आरक्षण लिंगायत, हिंदू लिंगायत नावाने जातीची नोंद असणाऱ्यांना लागू करावे. त्यासंक्ष सरकारने शुद्धीपत्रक काढावे किंवा सरसकट लिंगायतांना आरक्षण द्यावे. अशी मागणी आम्ही वारंवार सरकारकडे केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यांनी प्रत्येकवेळी आम्हाला आरक्षण देऊ असे सांगितले. पण ते अद्याप मिळाले नाही. मागील सरकारने जशी फसवणूक केली तशीच फसवणूक हे सरकारही करत आहेत. याचा परिणाम येणाऱ्या निवडणूकीच्या निकालावर नक्कीच जाणवेल, इतक्या भावना लिंगायत समाजाच्या दुखावलेल्या आहेत.

Web Title: Chief Minister not Liable To his Word