दानवे यांची मुक्ताफळे मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

उस्मानाबाद, जालना - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांप्रती उधळलेली मुक्ताफळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या चांगलीच अंगलट आल्याचे शनिवारी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात दिसले. दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री काय बोलतील, याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना त्यांनी उस्मानाबाद आणि दानवे यांची कर्मभूमी असलेल्या जालन्यात मौन पाळले. विशेष म्हणजे त्यांनी या दौऱ्यात तुरीचा विषयच काढला नाही. शेतकरी कर्जमाफीप्रश्‍नी काही ठिकाणी त्यांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत झाले. दानवे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मुलांनी शुक्रवारी (ता. 12) सुरू केलेले आंदोलन पोलिसांनी चिरडून टाकत त्यांना रातोरात हलविले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर दानवे यांच्या वक्तव्याची काळी छाया दिसली.

जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी आणि जिल्हानिहाय विकासकामांच्या आढाव्यासाठी फडणवीस सकाळीच उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. वाशी तालुक्‍यातील पहिल्याच दौऱ्यात अचानकपणे दाखल झालेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीप्रश्‍नी खिशातून काळे झेंडे काढून त्यांना दाखविले. या वेळी नेते, पदाधिकारी आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पुढील दौऱ्यात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. भूममध्ये पत्रकारांनी दानवे यांच्या वक्तव्याचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर त्यांनी मौन पाळले आणि जालना जिल्ह्यात मार्गस्थ झाले.

जाफराबाद (जि. जालना) तालुक्‍यातील खासगाव, सिंधी येथे कामांच्या पाहणीनंतर सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत जालना शहरात एक कार्यक्रम झाला. उस्मानाबादला न जाणारे दानवे जालना जिल्ह्यातील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत होते. तुरीसंदर्भात फडणवीस यांनी बोलणे टाळले. भूमच्या आढावा बैठकीत मात्र त्यांनी तूर खरेदी वेळेवर करण्याच्या सूचना दिल्या. दानवे यांनी जेथे वादग्रस्त वक्तव्य केले, त्या जालन्यात तरी मुख्यमंत्री काही भूमिका मांडतील, अशी अपेक्षा होती; मात्र तेथेही त्यांनी यासंदर्भात शब्दही उच्चारला नाही.

Web Title: chief minister problem by danave talking