घाटीच्या सुपरस्पेशालिटी विंगचा मुख्यमंत्री घेणार आढावा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद - घाटीत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या तिसऱ्या फेजमधून उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी विंगचा पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आढावा घेणार आहेत. त्या संदर्भात राज्यातील अकोला, लातूर, यवतमाळ, औरंगाबाद येथील सुपरस्पेशालिटीच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक वाकोडे यांनी शुक्रवारी (ता. 20) मुंबईत घेतला. 

केंद्र आणि राज्य शासनाच्या 150 कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या 253 खाटांच्या या स्वतंत्र विंगमध्ये युरॉलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी, निओनॅटॉलॉजी, बर्न्स-प्लास्टिक, सीव्हीटीएस हे सुपरस्पेशालिटी विभाग असतील. सध्या या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून फरशी, दरवाजे, रंगकाम, फिनिशिंग सुरू आहे. त्यानंतर यंत्रसामग्री फिटिंग व विद्युतीकरणाला साधारण सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. सोमवारपासून (ता. 16) आतापर्यंत झालेल्या बांधकामाचे थर्ड पार्टी स्ट्रक्‍चर ऑडिटसाठी आठ दिवसांपासून दिल्लीचे पथक आलेले आहे. 

प्रस्तावातील बदल सुरूच 
सुपरस्पेशालिटी विंगसाठी पदनिर्मिती आणि पदस्थापना करण्याच्या हालचालींना मध्यंतरी वेग आला होता. त्यासाठी श्रेणी- एक ते चारचा सुधारित स्वतंत्र मनुष्यबळाचा 1,414 पदनिर्मितीचा प्रस्ताव तीन टप्प्यांत डीएमईआरला डिसेंबरमध्ये सादर करण्यात आला होता. त्याअगोदर हा प्रस्ताव 1,379 पदांचा होता. आता नव्याने यातील काही पदे कमी करून हा प्रस्ताव 1,148 पदांचा करण्यात आला. प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर गेल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. 

राज्यातील चार सुपरस्पेशालिटीच्या बांधकामाचा आढावा मुंबईत डीएमआरई कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुढील महिन्यात मुख्यमंत्री आढावा घेतील. त्या संदर्भात तयारी सुरू आहे. सध्या 70 टक्के बांधकाम झाले आहे. पुढील तीन महिन्यात बांधकाम पूर्ण होईल, तर सहा महिन्यांत यंत्रसामग्री मिळण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत पदनिर्मितीचा निर्णयही होईल. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी. 

Web Title: Chief Minister to review ghati hospital