नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांची योग साधना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

हशा आणि टाळ्याही
योगासने करीत असतानाच रामदेव बाबा अधूनमधून राजकीय टिपण्णी आणि खुसखुशीत भाष्य करून उपस्थितांकडून हशा आणि टाळ्याही मिळवीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना त्यांनी ‘महाराष्ट्राला सात्विक, सत्वशील आणि प्रामाणिक अजातशत्रू मुख्यमंत्री मिळाला असल्याचे सांगितले. नांदेडमध्ये एका दिग्गज नेत्याला पराभूत करून खासदार चिखलीकर यांनी ‘प्रताप’ घडविल्याचे सांगितले.

नांदेड -  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडला शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामदेव बाबा यांच्यासोबत योग साधना केली. शिबिरात एकाच वेळी एक लाख दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामुळे यापूर्वीचा विक्रम मोडीत काढत ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’कडून नव्या विक्रमाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

राज्यात मुंबईसह विविध भागांत योग दिन साजरा करण्यात आला. राज्य सरकार, पतंजली योगपीठाच्या वतीने कौठा, असर्जन परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री फडणवीस, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह उपस्थित सर्वांनी रामदेव बाबा यांच्यासमवेत योगाभ्यास केला. रामदेव बाबांच्या जीवनावर आधारित ‘जीवन, मेरा मिशन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते  झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Yoga