चिकलठाणा विमानतळ ‘टॉप टेन’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

देशातील टॉप टेन विमानतळ
१) रायपूर
२) उदयपूर
३) त्रिची
४) वडोदरा
५) देहरादून
६) गया
७) जोधपूर
८) मदुराई
९) पोर्ट ब्लेअर जम्मू
१०) चिकलठाणा विमानतळ.

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळवीत औरंगाबादचा नावलौकिक वाढवला आहे.

एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देशभरातील ५२ विमानतळांचे सर्वेक्षण जानेवारी ते जूनदरम्यान करण्यात आले होते. यात एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड ठेवण्यात आले होते. त्यात स्वच्छता, पार्किंग, बॅग्ज डिलिव्हरी स्पीड, वॉशरूम सुविधा, ट्रॉली सुविधा, चेक इन लाइन, सुरक्षा, विमानतळावरील कर्मचाऱ्यांची वागणूक, फ्लाईट इन्फॉर्मेशन स्क्रीन, सुरक्षा तपासणीत लागणारा वेळ, शिष्टाचार आणि निरीक्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्तणूक, इंटरनेट सुविधा, रेस्टॉरंट, एटीएम सुविधा, मनी एक्‍स्चेंज यासह विमानतळावरील परिसराची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात रायपूर विमानतळ गेल्या वर्षापासून पहिल्या क्रमांकावर कायम राहिले आहे. तर दहाव्या क्रमांकावर चिकलठाणा विमानतळाने स्थान पटकावले आहे.  

दर्जाचे काय?
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक सोयी-सुविधांच्या बरोबरच आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी हे विमानतळ सज्ज आहे. गेल्या वर्षी धावपट्टीचे विस्तारीकरण केले आहे. तब्बल २.२७ किलोमीटरची धावपट्टी आहे. या विमानतळावरून हजला जाणाऱ्या विमानाचे जेद्दासाठी उड्डाण होते. देशाअंतर्गत दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद अशा केवळ तीन विमानांचे उड्डाण होत आहे. मुंबईची जेट एअरवेजची सेवा बंद पडली असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने नवीन विमान सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात नाही.

Web Title: Chikalthana Airport in Top Ten