चिकलठाण्यातही कचराबंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - शहर परिसरात कचरा प्रक्रिया केंद्राच्या नावाखाली महापालिकेने पुन्हा एकदा नारेगावप्रमाणेच डंपिंग ग्राउंड तयार केले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी, कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून, हर्सूलपाठोपाठ चिकलठाणा येथील संतप्त नागरिकांनी महापालिकेला कचरा टाकण्यास विरोध करीत बुधवारी (ता. चार) रात्री ट्रक परत पाठविले. गुरुवारी महापौरांनी नागरिकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत एक गाडीही इथे येऊ देणार नाही. वेळ पडल्यास गाडीखाली झोपू, असा निर्वाणीचा इशारा नागरिकांनी या वेळी दिला. 

कचराकोंडीनंतर महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शहरात रस्त्यावर पडून असलेला कचरा या ठिकाणी टाकण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कचरा उचलण्यास सुरवात केली; मात्र ओला व सुका असा मिक्‍स कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर फक्त ओला कचरा या ठिकाणी टाकू असे आश्‍वासन महापालिकेतर्फे देण्यात आले होते. हे आश्‍वासनदेखील पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. हर्सूल येथील सार्वजनिक विहिरीशेजारीच कचरा प्रक्रिया केंद्र असल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले. त्यानंतर महापौरांनी या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आदेश दिले. त्यामुळे हे केंद्र सध्या बंद आहे. त्यानंतर बुधवारी रात्री चिकलठाणा येथील नागरिकांनी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या परत पाठविल्या.

कचरा प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यापासून येथे आणलेल्या व साठलेल्या कचऱ्यावर अद्याप कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. नारेगावप्रमाणेच येथे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. येथील स्क्रीनिंगची मशीनही इतरत्र नेण्यात आली, असे सांगत यापुढे एकही गाडी आणायची नाही, असा इशारा नागरिकांनी या वेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिला. या वेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाबासाहेब दहीहंडे, रमेश नवपुते, कचरू कावडे, संजय गोठे, नारायण गव्हाणे यांची उपस्थिती होती.

महापौरांची विनंती फेटाळली 
नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची महापालिकेमार्फत काळजी घेतली जाईल. कुत्रे पकडण्याची गाडी तातडीने पाठवा, वास येऊ नये म्हणून औषध फवारणी करा, माशा मारण्यासाठी देखील फवारणी करण्याचे आदेश महापौरांनी या वेळी दिले; मात्र नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. कचऱ्यावर जोपर्यंत प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत एकही गाडी येऊ देणार नाही, असा इशारा महापौरांना देण्यात आला.

ताडपत्रीचे पैसे खाल्ले, विनंती कशाला करता? 
कचरा टाकण्यापूर्वी जमिनीखाली ताडपत्री न टाकता त्याचे पैसे अधिकाऱ्यांनी खाल्ले, तुम्ही आम्हाला विनंती कशाला करता, अशा शब्दात नागरिकांनी महापौरांना जाब विचारला.

दोन किलोमीटरपर्यंत दुर्गंधी 
चिकलठाणा परिसरात सिडको-हडको हडकोतील कचरा पूर्वी टाकला जात होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून जुन्या शहरातील कचरा येथे टाकण्यात येत आहे. मेलेली जनावरे, मांसही कचऱ्यासोबत आणले जात आहे. त्यामुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, असे नागरिकांचे म्हणणे होते.

  महापालिकेचे दुसरे कचरा प्रक्रिया केंद्रही बंद
  प्रक्रियेसाठी मशिनरी येत नाही तोपर्यंत गाडी येऊ देणार नाही
  संतप्त नागरिकांनी दिला महापौरांना इशारा

Web Title: Chikalthana Garbage ban