चिकलठाण्यात पाण्याअभावी उद्योगांची पळापळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या मानगुटीवर बसलेले ‘पाणीटंचाई’चे भूत उतरण्याचे नाव घेत नाही. पाण्यावर आधारित उद्योगांना शुद्ध पाण्यासाठी ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ अर्थात आरओ प्लॅंटने पाण्याचे शुद्धीकरण करावे लागत असून, एमआयडीसीचे नळ निम्मी गरज भागवण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. 

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या मानगुटीवर बसलेले ‘पाणीटंचाई’चे भूत उतरण्याचे नाव घेत नाही. पाण्यावर आधारित उद्योगांना शुद्ध पाण्यासाठी ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ अर्थात आरओ प्लॅंटने पाण्याचे शुद्धीकरण करावे लागत असून, एमआयडीसीचे नळ निम्मी गरज भागवण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पाण्यावर आधारित उद्योगांची पाण्यासाठी चांगलीच तारांबळ उडत आहे. पाण्याची किमान गरजही भागत नसताना आता टॅंकरच्या पाण्यावर उद्योग चालवण्याची वेळ येथील उद्योगांवर आली आहे. एप्रिलपासून सुरू असलेली पाण्याची ही आणीबाणी जून लागला तरी संपलेली नाही. आठवड्यातून अनेक दिवस पाणी गायब होत असून, जेव्हा पुरवठा होतो तेव्हा नळाचे प्रेशर काहीच उपयोगाचे नसल्याच्या अनेक तक्रारी येथील उद्योजकांनी एमआयडीसीकडे केल्या आहेत; मात्र तरीही परिस्थिती सुधारलेली नाही. पेपर उद्योगात कार्यरत असलेले नीलेश पाटील यांनी सांगितले, की ‘‘आमच्या कंपनीला बॉयलर चालवण्यासाठी २५ हजार लिटर पाणी लागते. त्यातील निम्मी गरजही भागत नाही. टॅंकरचे पाणी विकत घेऊन त्याच्यावर आरओ प्लॅंटमध्ये प्रक्रिया करून बॉयलरमध्ये वापरावे लागत असल्याने शुद्धीकरणासाठी दिवसाकाठी किमान दीड ते दोन हजार लिटर पाणी फेकण्यात जात आहे.’’ 

शेंद्रा वसाहतीतही पाण्याची समस्या 
शेंद्रा फाइव्ह स्टार औद्योगिक वसाहतीतही पाण्याची अडचण वाढत असल्याचे उद्योजक नीलेश पाटील यांनी सांगितले. दिवसा येथील उद्योगांना पुरवठा होतच नसून रात्री पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले. कंपन्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत असून, याचा परिणाम उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मसिआचे जनसंपर्क अधिकारी मनीष अग्रवाल म्हणाले. 

Web Title: chikalthana MIDC water issue