कोरोनापेक्षा आता बीडमध्ये चिकनगुण्या, डेंगी, न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

दत्ता देशमुख
Tuesday, 22 September 2020

बीड शहरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

बीड : केलेले आम्ही केले, त्यांनी फक्त वाईट केले अशी सत्ताधाऱ्यांची भांडणे आणि श्रेयवाद बीडकरांच्या जिवावर उठत आहे. पावसामुळे गटारगंगा, त्यातून दुर्गंधी, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे अशी घाण अन् अस्वच्छतेचा रोग बीड शहराला जडला आहे. कोरोनाच्या रुग्णांपेक्षा शहरात आता चिकनगुण्या, डेंगी आणि न्यूमोनियाचे रुग्ण वाढत असताना पालिका प्रशासन सुस्त आणि सत्ताधारी भांडणात व्यस्त आहेत.

लातूरसाठी ऑगस्टपेक्षा सप्टेंबर ठरतोय धोकादायक, वीस दिवसांत सहा हजार २७७ जण...

कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वच्छता (हात धुण्यासाठी व्यवस्था, निर्जंतुकीकरण) करण्याबाबत शासनाने काही बंधने घातली. चार दिवस चौकांत पाण्याच्या टाक्या मांडण्याचा देखावा सादर झाला; पण त्यातही श्रेयाला मागे हटतील ते सत्ताधारी कसले! निर्जंतुकीकरण फवारणीचेही तेच झाले.
आता कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बीड शहर आणि तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे; मात्र पंधरवड्यात कोरोनोपक्षा अधिक चिकनगुण्या, डेंगी, न्यूमोनिया अशा तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

शहरातील घाण, दुर्गंधी, अस्वच्छता हीच बीडकरांवर या रोगराईसाठीची मेहेरबानी ठरत आहे. जागोजागी उखडलेले रस्ते, चिखल, खड्डे ही समस्या बीडकरांना अंगवळणी पडली आहे. खड्ड्यातून चालल्याशिवाय वाहन चालविल्याचा आनंदही बीडकरांना मिळत नाही. पण, आता नव्या चिकनगुण्या, डेंगी, न्यूमोनिया अशा गंभीर रोगराईची मेहेरबानीही पालिकेच्या सुस्त कारभारामुळे बीडकरांना भोगावी लागत आहे. नाल्याची सफाई नसल्याने पाऊस पडताच नाल्या तुंबतात आणि सखल भागात पाणी साचते. मग, त्यातून दुर्गंधी, डास आणि मग रोगराई हे चित्र आहे. घंटागाड्या घरोघरी येणार, स्वच्छ शहर सुंदर शहर हे फक्त बोलण्या-ऐकण्यापुरते राहिले आहे.

रस्ता चांगला की खराब? कळणार एका क्लिकवर, लातूर जिल्ह्यासाठी खास सॉफ्टवेअर

कचराकुंड्या ओव्हरफ्लो
शहरातील शाहूनगर, सहयोगनगर, सम्राट चौक, बीएसएनएल या प्रमुख रस्त्यांनी पाहिले तर पालिकेच्या कचराकुंड्या ओव्हरफ्लो आहेत. नाल्या तुंबलेल्या आहेत. असेच चित्र शहरातील सर्वत्रच आणि सत्ताधाऱ्यांच्या घरांभोवतीही आहे. अलीकडे वरील आजारांचे रुग्ण वाढत आहेत. शासकीय आणि खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झालेले आहेत. ताप म्हटले की अगोदर कोविड टेस्टच्या भानगडीतून जाताना रुग्णाच्या जिवावर बेतत आहे. कोरोनाच्या बळींबरोबर डेंगी, न्यूमोनियानेही बळी गेले आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. सत्ताधारी श्रेयवाद आणि भांडणात गुंग असल्याने प्रशासनही सुस्त झाले आहे; पण याचे परिणाम बीडकरांना भोगावे लागत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chikangunya, Degue Cases Hikes In Beed