चिकलठाण्यातील गोदामाला संशयाची आग 

चिकलठाण्यातील गोदामाला संशयाची आग 

औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33 लाख रुपयांचे नवीन साहित्य जळून खाक झाले. 

महापालिकेने शहरातील सुमारे 40 हजार जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी नवे एलईडी पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्‍ट्रॉन एनर्जी प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. 120 कोटींचा हा प्रकल्प असून, कंपनीला शहरातील संपूर्ण पथदिव्यांची केबल बदलणे, जंक्‍शन बॉक्‍स उभारणी, नवीन 1200 पोल उभे करणे, विजेची बचत करणे तसेच 10 वर्षे संपूर्ण प्रकल्पाची देखभाल करणे अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत 27 हजार नवीन एलईडी दिवे बसविले आहेत. या कामांसाठी कंपनीने एमआयडीसी चिकलठाणा येथे गोडाऊन उभारले आहे. गोडाऊनमध्ये फिटिंग बॉक्‍स, केबल, जंक्‍शन बॉक्‍स, प्लॅस्टिक पाइप आदी साहित्य ठेवले होते. रविवारी दुपारी अचानक गोडाऊनला आग लागली. या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आज आग आटोक्‍यात आणल्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारकाईने तपासणी केली असता चार कोटी 33 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. गोडाऊनच्या दर्शनी भागात सुरक्षा रक्षक कक्षामागे अगोदर आग लावण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे; मात्र ती कोणी लावली हे लक्षात येत नाही. कंपनीने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले. फुटेजमध्ये काही व्यक्ती संशयित दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com