खाऊ देतो म्हणून तीन वर्षांच्या चिमुरडीला नेलं घरात.... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला न्यायालयानं दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

जालना : तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांनी सोमवारी (ता. 17) दहा वर्षे सश्रम कारावासासह पंचवीस हजारांचा दंड ठोठावला. कमलाकर लक्ष्मण ढसाळ (40, रा. समतानगर, ता. भोकरदन) असे आरोपीचे नाव आहे. 

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा  

भोकरदन येथील समतानगरात 20 नोव्हेंबर 2016 मध्ये आरोपी कमलाकर लक्ष्मण ढसाळ याने अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

भोकरदनचे तात्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडितेचे आजोबा, पीडित मुलगी, तपास अधिकारी वसावे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेसह पंचवीस हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील जयश्री सोळंके-बोराडे यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Abuse Case Ten Years Jail Sentenced To A Man Jalna News