मूल संकटात आहे? डायल करा '1098' 

शेखलाल शेख
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

संकटात असलेल्या सर्व शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी 1098 क्रमांकावर कॉल केल्यास मोफत मदत मिळते. 'चाईल्ड लाइन' प्रकल्पाने शहरातील 637 बालकांना मदतीचा हात दिला आहे.

औरंगाबाद : शहरात, परिसरात अनेकदा संकटग्रस्त मुले-मुली दिसून येतात. त्यातील काही बालक निराधार, एकटे असतात. काहींचा छळ होतो. अशा संकटात असलेल्या सर्व शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी 1098 क्रमांकावर कॉल केल्यास मोफत मदत मिळते. औरंगाबादेत हा उपक्रम मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेत "चाईल्ड लाइन' या प्रकल्पाद्वारे सुरू आहे.

Image result for childline aurangabad"

संस्थेने या माध्यमातून वर्षभरात 637 मुला-मुलींची मदत केली आहे. 
ही हेल्पलाइन चोवीस तास सुरू असते. तुम्ही जर तेथे फोन करून बालकांविषयी मदत मागितली तर तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. येथे शून्य ते अठरा वयोगटातील मुला-मुलींसाठी कार्य केले जाते.

हेही वाचा - अशा खपवतात बनावट नोटा 

तुम्ही जर कॉल केला तर तुमचा कॉल चाईल्ड लाइन केंद्राशी जोडला जातो. यानंतर मुलांच्या मदतीसाठी चाईल्ड लाइनचा चमू धावून जातो. मुलांना हवी असलेली मदत दिली जाते. 1 मे 2018 ते ऑक्‍टोबर 2019 यादरम्यान प्रकल्पाकडे 6 हजार 154 कॉल आले. त्यातील गरज असलेल्या तसेच मदत मागितलेल्या 637 मुलांना आवश्‍यक ती मदत देण्यात आली. 

अशी करतात मदत 

हरवलेली मुले, अत्याचारग्रस्त मुले, पळून गेलेली मुले, संकटात असलेली मुले, व्यसनाधीन, मजुरीकामाला लावलेले बालक, काळजी घेण्याची आणि संरक्षण देण्याची गरज आहे अशा सर्व मुलांना चाईल्ड लाइनच्या माध्यमातून मदत दिली जाते; तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाते. 

शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी आमच्याकडे अनेकांचे कॉल येतात. त्यासंबंधीची माहिती आम्हाला दिली जाते. आम्ही या मुलांना मदत करत असतो. आमचे भाग्यनगर बाबा पेट्रोलपंप आणि एएस क्‍लब येथे कार्यालय आहे. ज्यांना मदत हवी आहे ते चोवीस तास "1098' या क्रमांकावर कॉल करू शकतात. 
- अप्पासाहेब उगले, चाईल्ड लाइन प्रकल्प संचालक, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था. 

संस्थेने 1 मे 2018 पासून बालकांना अशी दिली मदत 

विधिसंघर्षग्रस्त बालके - 75 
बालविवाह प्रकरणे - 46 
शारीरिक अत्याचार - 43 
निवारा मदत - 45 
शिक्षण मदत - 84 
आरोग्य - 84 
हरवलेली मुले - 94 
समुपदेशन - 91 
बालकामगार - 26 
भिक्षा - 49 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Helpline Aurangabad News