मुलीची विक्री करून बालविवाह; शेण खाऊ घालून केला छळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पिडीतेची आई गावी गेल्यानंतर पंधरा दिवसांनी अग्रवाल कुटूंबियांनी तिचा छळ करायला सुरवात केली होती. पिडीतेला आरोपी अग्रवाल कुटूंबीय पिडीतेला बाथरुममध्ये कोंडून घेत, तिला शेण खाऊ घालत तसेच तिच्या गुप्त अंगावर देखील सिगारेटने चटके देत होते.

औरंगाबाद : मिसारवाडीतील 13 वर्षीय मुलीची एका कुटूंबाला विक्री करुन तिचा बालविवाह लावून दिला होता. त्यानंतर त्या कुटूंबीयांनी पिडीतेला शेण खाऊ घालणे, गुप्त अंगावर सिगारेटचे चटके देणे असा अमानुष प्रकार पिडीतेसोबत केला होता. मुलीचा गुरु, मावशी, चुलत मामा आणि अन्य दोन दलालांनी आरोपी अग्रवाल कुटूंबीयांसोबत मिळून हे कृत्य केले. 

प्रकरणात आरोपी संजय विरेंद्रकुमार अग्रवाल याला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तर त्याचे साथीदार आशा विरेंद्रकुमार अग्रवाल, दिपा विरेंद्रकुमार अग्रवाल, सागर विरेंद्रकुमार अग्रवाल, शरद उर्फ अतुल विरेंद्रकुमार अग्रवाल या चार आरोपींना 5 वर्षे सक्तमजुरी शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठाविली. विशेष म्हणजे आरोपी अटकेपासून कारागृहात होते. तर प्रकरणात उर्वरित सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

मूळच्या अंबाजोगाई तालुक्यातील पिडितेच्या आई सोबत त्यांचा चुलत भाऊ अशा दोघांची तीन वर्षांपुर्वी सुवर्णा वंजारे हिच्याशी परभणी रेल्वेस्थानकावर ओळख झाली होती. तेव्हापासून सुवर्णा दोघांच्या वारंवार संपर्कात होती. पिडितेची विक्री करण्याचा कट दलाल असलेल्या सुवर्णा, सुरेखा पवार, दलाल धुराजी सुखदेव सुर्यनारायण (53, रा. आंबेडकर चौक, आंबेडकरनगर) लातूर येथील मानधने आणि छाया नावाच्या महिलेने रचला होता. त्यांनी अग्रवाल कुटूंबाशी संपर्क साधून त्यानंतर पिडितेच्या आईला शहरात बोलावून घेतले होते. पिडितेसाठी अग्रवालचे स्थळ आल्याचे पवारने पिडितेच्या आईला सांगितले होते. त्यानुसार पिडितेची आई पिडिता आणि जावई सुदाम राठोड यांच्यासह 5 जुलै 2015 ला शहरात आल्या. यावेळी वंजारेच्या घरात सारिकाच्या पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अग्रवाल कुटूंबियांनी सारिकाला पसंत करत लगेचच तिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेत 6 जुलै 2015 ला अग्रवालच्या घरात तिचा मुख्य आरेापी संजय यांच्याशी विवाह लावण्यात आला. यावेळी दलाल मानधने याने भटजीची भूमिका साकारली होती. परंतू हा काय प्रकार सुरु असल्याची जराशीही कुणकुण या चौकडीने पिडितेच्या आईला लागू दिली नव्हती. आपल्या मुलीचे कल्याण झाले असाच समज पिडीतेच्या आईचा झाला होता. पिडीतेची आई गावी गेल्यानंतर पंधरा दिवसांनी अग्रवाल कुटूंबियांनी तिचा छळ करायला सुरवात केली होती. पिडीतेला आरोपी अग्रवाल कुटूंबीय पिडीतेला बाथरुममध्ये कोंडून घेत, तिला शेण खाऊ घालत तसेच तिच्या गुप्त अंगावर देखील सिगारेटने चटके देत होते. ही घटना उडकीस आल्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात अग्रवाल कुटूंबीयांसह बारा जणांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांनी तपास करुन 2 हजार 500 पानांचे दोषरोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी 13 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला संजय अग्रवाल याला 10 वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तर आरोपी आशा, दिपा, सागर व शरद उर्फ अतुल अग्रवाल  या चौघांना 5 वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, इतर कलमान्वये पाचही आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 500 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी शिक्षा ठोठाविली. सर्व शिक्षा आरोपींनी एकत्रीत भोगायच्या आहेत.

सात जणांची निर्दोष मुक्तता :
प्रकरणात सुवर्णा वंजारे, सुरेशा बावने, छाया जाधव, आशा सोनवणे, सुखदेव सूर्यनारायण, विठ्ठल पवार व रघुनाथ मानधने यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सुवर्णा वंजारे, सुरेशा बावने, छाया जाधव, आशा सोनवणे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.

Web Title: Child marriage by selling a girl at Aurangabad