रडण्‍याचा आवाज येऊ नये म्‍हणून आईने बाळाचे नाक-तोंड दाबल्यानेच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सिल्लोड - घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे रविवारी (ता. एक) झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाच्या खुनाचा ग्रामीण पोलिसांनी आठवडाभरातच छडा लावला असून, बाळाच्या आईकडूनच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

सिल्लोड - घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे रविवारी (ता. एक) झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाच्या खुनाचा ग्रामीण पोलिसांनी आठवडाभरातच छडा लावला असून, बाळाच्या आईकडूनच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

मृत बाळाच्या चुलत मामाने फिर्याद दिल्यामुळे मुलाचे वडील, चुलता यांना पोलिसांनी अटक केली होती; परंतु पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बाळाच्या आईनेच खून केल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक आमटे यांनी दिलेली फिर्याद मृत बाळाची आई कविता मोरे हिचा जबाब, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल, पोलिसांचा तपास यावरून खुनाच्या घटनेवर प्रकाश पडला. कविता मोरे, तिचा पती संदीप मोरे यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. याचा राग मनात घेऊन कविता हिने घरातील सर्वजण झोपेत असताना बाळासह सकाळी पाचच्या सुमारास घरातून पलायन केले. शेतातील पायवाटेने जात असताना बाळ रडत असल्यामुळे त्याच्या रडण्याचा आवाज कोणास ऐकू जाऊ नये म्हणून बाळाचे नाक, तोंड स्वतःच्या अंगाशी घट्ट आवळल्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला.

बाळाचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात येताच स्वतः केलेला गुन्हा लपविण्यासाठी तिने गावालगतच्या नाल्यातील वाळूमध्ये त्यास पुरून टाकले. दिवस उजाडल्यानंतर नातेवाईक शोध घेत असल्याचे कळताच कविता बाळास पुरलेल्या ठिकाणाहून जवळ असलेल्या झाडामध्ये लपून बसली. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणाहून पळत असताना गावातील लोकांना ती आढळून आली; परंतु सोबत बाळ नसल्यामुळे नातेवाइकांनी तिची विचारपूस केली असता तिने माहेरच्या लोकांना बाळ पुरलेले ठिकाण दाखविले. त्यांनी वाळू बाजूला करीत मृत बाळासह कवितास सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गुन्हा लपविण्यासाठी तिने माहेरच्या लोकांना बाळास त्याच्या वडिलांनी, चुलत्याने मारून मृतदेह नाल्यातील वाळूत पुरून टाकल्याचे सांगितले. तपासामध्ये संशयाची सुई बाळाच्या आईकडेच जात असल्यामुळे पोलिसांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता, घडलेल्या घटनेचा पश्‍चात्ताप होत असल्याचे सांगत शुक्रवारी (ता. सहा) गुन्हा घडवून आणल्याचे सांगत खून झाल्याची कबुली दिली.

गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनामध्ये ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास पाटील यांनी त्यांच्या पथकासह तडीस नेला.

Web Title: child murder by mother