बालकामगारांचे सर्वेक्षण थांबले

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 5 जुलै 2018

औरंगाबाद - सोशल मीडियावर सध्या मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा व्हायरल झाल्याने राज्याच्या विविध भागांत संशयावरून अनेक जणांचा नाहक बळी गेला आहे. गावोगावी नवखा माणूस दिसला, की त्याच्याकडे संशयाने पाहिले जात असून, याचा फटका बालकामगारांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावर झाला आहे. या अफवेमुळे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनाही गावकऱ्यांकडून धक्‍काबुक्की झाली. त्यामुळे हे कामच थांबवावे लागले आहे.

बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील बालमजुरांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या प्रकल्पांतील शाळांमधून केले जाते. अशा बालकामगारांचा शोध घेण्यासाठी जिल्हाभरात एप्रिलमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र, काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्यात, अशी अफवा पसरल्यामुळे संशय वाढला आहे. लहान मुलांसोबत बोलताना बघितल्यामुळे तीन शिक्षकांना लोकांनी धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार घडला.

शिक्षकांमध्ये भीती
या प्रकल्पातील सर्वेक्षण हे ९ ते १४ वयोगटातील मुलांशी संबंधित असल्यामुळे लहान मुले पळवून नेणारी टोळी समजून शिक्षकांनाच थेट या टोळीतील समजून पडेगाव, ढोरकीन आणि अन्य एका गावात बांधून ठेवण्यात आले होते. यामुळे सद्यःस्थितीत गावांमध्ये जाण्याबद्दल भीती व्यक्‍त होत आहे.

Web Title: child worker survey