मुलांना 'नाही' म्हणायला शिका आणि नकार पचवायला शिकवा

मुलांचे समुदेशन
मुलांचे समुदेशन

औरंगाबाद - तात्कालिक कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात कुत्रा पाळायला विरोध केल्याने सिडकोतील सातवीतील विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची घटना फार जुनी नाही. त्यामुळे मुलांना नकार पचवायला शिकविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

याविषयी "सकाळ'ने बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष महेंद्रवार यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुलांची सध्याची पिढी जनरेशन नेक्‍स्ट आहे. पालकांचे विचार त्यांच्यासोबत जुळतीलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांशी विचार मिळवून निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्या मुलांना समजावून सांगणेही तितकेच आवश्‍यक आहे.

मुलांना "नाही' ऐकून घ्यायची सवय उरलेली नाही. तात्कालिक कारणाने झाले असे म्हणता येणार नाही. ते हट्टी आधीपासून असतात. त्यांच्या त्या लक्षणांकडे दुर्लक्ष होता कामा नये. मुलांना सोशल मीडिया, समाजातून काय इनपुट मिळताहेत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांशी मित्र म्हणून संबंध ठेवले पाहिजेत. एका घटनेने आत्महत्या केली असे नसते. मूल जर गरजेपेक्षा जास्त हट्टी आहे हे लक्षात आल्यावर त्याचे समुपदेशन, समजूत काढणे आणि आवश्‍यकता भासल्यास तज्ज्ञांना दाखवले पाहिजे. पूर्वी मुले हट्टासाठी रडपड करायची. मात्र, हट्ट पूर्ण न झाल्यावर काय करायचे हे कुठून तरी ते शिकत आहेत. ते काय माध्यम आहे, त्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या संस्कारांवरही भर द्यावा.'' 
- डॉ. मकरंद कांजाळकर, न्युरोफिजिशियन 

सध्याच्या पिढीत संयम फार कमी आहे. लहानपणापासून प्रत्येक हट्ट पुरवताना त्यांना नकार पचवायला शिकवायचे राहून जाते. त्यामुळे पालकांनी मुलांना नकार पचवणे शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी मारण्याचा व रागावण्याचा पर्याय निवडला तर ते भावनाशून्यतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे मुलांचे संगोपन शिकण्याची वेळ पालकांवर आली आहे. 

छोट्या - छोट्या कारणांवरून मुलांत वर्तणूक व भावनिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कमीपणा, अपराधीपणाची भावना निर्माण होत असते. अशी मुले अतिसंवेदनशील तर स्वभाव अधिकाधिक लहरी होत जातो. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी ते सुटकेचा मार्ग शोधत असतात. या काळात त्यांच्याशी पालकांचा असलेला संवाद, नाते यावरून ते ठरते. मुलगा सध्या कोणत्या वातावरणात जगतोय. तो तुलनात्मकता कशी करतोय याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सध्या आत्महत्येवरील गेम्स, टीव्ही सिरियल, वेबसिरीजचा मुलांवर परिणामही पडल्याचे जाणवत आहे. मुले आजुबाजुला बघून शिकतात. निराशा, मरगळ, कमीपणा, संवेदनशीलता यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. त्यामुळे मुले स्ट्रेसफूल प्रसंगात कसे वागतात अन्‌ कसे बाहेर पडतात, हे पालकांनी पाहिले पाहिजे. तसेच सुसाईडच्या एक्‍स्पोझरपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे.'' 
- डॉ. प्रदीप देशमुख, मनोविकृशास्त्र विभागप्रमुख, घाटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com