लातूरसह राज्यात सर्वत्र 'चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट'

सुशांत सांगवे
रविवार, 16 डिसेंबर 2018

कमी वेळेत युक्तिवाद, ही काळाची गरज
बऱ्याच देशातील न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी वकिलांना कमीत कमी वेळ दिला जातो. आपणही कमी वेळेत युक्तिवाद करावा. या चांगल्या परंपरेची सुरवात लातूरमधून करा. खरंतर ही काळाची गरजच आहे. कमी वेळेत सर्व मुद्दे यायला हवेत म्हणजे न्यायालयाचा वेळ वाचेल आणि इतर पक्षकारांना लवकर पुढे येत येईल, असे पाटील यांनी संगितले.

लातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र चिल्ड्रन फ्रेंडली कोर्ट सुरु केले जाणार आहेत. लातुरातही हे कोर्ट लवकरच सुरू केले जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी जाहीर केले. या न्यायालयाची कल्पना अद्याप नवीन आहे. इथे मुलांसाठी खेळणीसुद्धा असतील, असेही ते म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाल्याबद्दल पाटील यांचा लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे आयोजित सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय अचलिया, जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी, जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे, मंडळाचे अध्यक्ष रशीद शेख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, "लातूरमधील जिल्हा न्यायालयात जागेचा प्रश्न आहे. 25टक्के वकिलांना अर्ज द्यायला जागा नाही. पार्किंगचीही मोठी समस्या आहे. या सर्व प्रश्नांकडे माझे गांभीर्याने लक्ष आहे. या समस्या लवकरच सोडवल्या जातील. शिवाय, न्यायालयासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधाही पुरवल्या जातील." वकिली व्यवसायात येणाऱ्या तरुणांनी धीर ठेवायला हवा. लगेच भरमसाठ केस मिळत नाहीत. अभ्यास करत राहावा. कॉरिडॉरपेक्षा ग्रंथालयात किंवा अनुभवी वकीलांसोबत वेळ घालवावा. निकाल मनासारखा लागला नाही म्हणून निराश होऊ नये, असा सल्लाही त्यांनी तरुण वकिलांना दिला.

कमी वेळेत युक्तिवाद, ही काळाची गरज
बऱ्याच देशातील न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी वकिलांना कमीत कमी वेळ दिला जातो. आपणही कमी वेळेत युक्तिवाद करावा. या चांगल्या परंपरेची सुरवात लातूरमधून करा. खरंतर ही काळाची गरजच आहे. कमी वेळेत सर्व मुद्दे यायला हवेत म्हणजे न्यायालयाचा वेळ वाचेल आणि इतर पक्षकारांना लवकर पुढे येत येईल, असे पाटील यांनी संगितले.

मी लातुरचा, याचा अभिमान
आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी बनावे, असे वाटत असते, तसे मला वकील व्हावे असे वाटायचे. वडीलसुद्धा याच व्यवसायात होते. त्यांचा संघर्ष मी जवळून पहिला आहे. या क्षेत्रात परिश्रमाशिवाय दुसरा मार्ग नाही. कुठलाही शॉर्टकट नाही, असे सांगून पाटील म्हणाले, "मी लातूरचा आहे, याचा मला अभिमान आहे. इथे आल्यानंतर मला माझे जुने दिवस आठवले. जीवनात मिळालेल्या गुरूंमुळे, ग्रंथामुळे मी घडलो."

Web Title: children friendly court in Latur