ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना बळ

शेखलाल शेख
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

  • आपली मुलं प्रकल्पाअंतर्गत देणार मोफत निवासी शिक्षण

औरंगाबाद- ऊसतोड कामगार हा समाजातील अत्यंत वंचित, दुर्लक्षित घटक. दोनवेळच्या भाकरीसाठी संपूर्ण कुटुंबालाच आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यांत जावे लागते. कित्येक महिने उसाच्या फडात जीवन जगणाऱ्या कुटुंबात सर्वाधिक फरपट होते ती त्यांच्या मुलांची. हे कुठेतरी थांबावे, मुलांना चांगले, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी औरंगाबादेतील श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेने ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी "आपली मुलं' प्रकल्प सुरू केला. यात पहिलीपासून पुढील सर्व शिक्षण मोफत दिले जाणार आहे. सोबतच राहणे, जेवणे, आरोग्य, शैक्षणिक साहित्यसुद्धा मोफत दिले जाणार आहे. हीच संस्था 2015 पासून आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील 210 मुला-मुलींना याचप्रकारे मोफत शिक्षण देत आहे. 

ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाची काही महिने सोडले तर ऊसतोडीच्या ठिकाणी फरपट होते. कित्येक कुटुंबांसमोर उपासमारीबरोबर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍नही गंभीर असतो. जिथे दोनवेळच्या जेवणाची चिंता असते अशा कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळणे अवघड असते. अशाच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेने "आपली मुलं' प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींना संस्थेत तातडीने मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय या मुलांचे राहणे, नाश्‍ता, जेवण, गणवेश, सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च संस्थेकडेच राहणार आहे. संस्थेकडे सध्या 300 विद्यार्थी राहू शकतील इतकी व्यवस्था आहे. 

सामाजिक दायित्व म्हणून कार्य 
सध्या बीड बायपास रोड येथील संस्थेच्या संकुलात 210 आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुले-मुली आहेत. यामध्ये 68 मुली आहेत. याच धर्तीवर ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्याप्रकारे आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुले शिक्षण घेत आहेत, त्याचप्रकारे ऊसतोड कामगारांची मुलेसुद्धा शिक्षण घेतील. संस्था विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते पूर्ण शिक्षण होईपर्यंत सुविधा पुरविते. बीड बायपास रोड येथे संस्थेकडे पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहेत. यानंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी संस्थाच विद्यार्थ्यांना शहरातील इतर महाविद्यालयांत प्रवेश घेऊन देणार आहे. हे शिक्षण सुरू असताना या विद्यार्थ्यांना राहणे, जेवण, शैक्षणिक साहित्य अशा सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच दिल्या जाणार आहेत. 
 
पैठण तालुक्‍यातही सुविधा 
बीड बायपास परिसरात संस्थेच्या संकुलात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात असताना येथे जागा कमी पडल्यास विद्यार्थ्यांना चौंढाळा (ता. पैठण) येथेसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. येथे संस्थेचे अध्यक्ष श्‍यामसुंदर कणके यांची पन्नास एकर जमीन असून, त्यांनी संस्थेच्या नावावर दहा एकर जमीन करून येथील शैक्षणिक संकुलात राहणे, जेवण, शिक्षणाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा आहे. 
 
येथे करावा संपर्क 
श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्था, बीड बायपास रोड. संपर्क क्रमांक : श्‍यामसुंदर कणके : 8830259443. 

 

 
मी एका शेतकरी कुटुंबातील असल्याने काम करून शिक्षण घेतले. सेवा करण्याची भावना मनात असल्याने सामाजिक दायित्व म्हणून गरजूंसाठी काम करतो आहे. शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींची जबाबदारी घेतलेली असताना आता ऊसतोड कामगारांच्या मुलांनासुद्धा चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी उचलणार आहे. असे कुटुंब असल्यास आमच्याशी संपर्क करावा. 
- श्‍यामसुंदर पंडितराव कणके, संस्थाध्यक्ष. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: children of sugercane cuttres gets energy