मुलांच्या सुरक्षेला हवी आणखी एक बस फेरी!

पंजाब नवघरे
मंगळवार, 23 जुलै 2019

- अकोली आणि पुयनी परिसरातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे.

- त्यामुळे या भागात जास्त बस सुरू करण्याची गरज आहे.

वसमत ( जि. हिंगोली) : तालुक्यातील अकोली आणि पुयनी परिसरातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळे या भागात जास्त बस सुरू करण्याची गरज आहे.

वसमत तालुक्यातील अकोली आणि पुयनी या भागातील सुमारे दीडशे पेक्षा अधिक विद्यार्थी दररोज वसमत येथे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जातात. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वसमत आगाराची पुयनी ते वसमत ही बस सेवा आहे. पुयनी येथून सकाळी साडेसहा वाजता वसमत कडे जाण्यासाठी बस सोडली जाते. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांची ही मोठी गर्दी असते पुयनी व अकोली येथील सुमारे दीडशे विद्यार्थी या बसमध्ये असतात.

सकाळी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी एकमेव बस अल्यामुळे विद्यार्थी जागा मिळेल तिथे उभे राहतात. तर काही विद्यार्थ्यांना चक्क बसच्या टपावरून प्रवास करावा लागतो. सुमारे पंधरा किलोमीटर अंतराचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी मात्र जीवघेणा ठरू लागला आहे. दररोज किमान पंधरा ते वीस विद्यार्थी बसच्या टपावर बसलेल्या असतात.

विद्यार्थ्यांचा शाळेसाठी असलेला हा प्रवास पाहून विद्यार्थी घरी येईपर्यंत पालकांच्या मनामध्ये धाकधूक होत आहे. सकाळी साडेसहा वाजताची बस गेल्यानंतर पुन्हा वसमत कडे जाण्यासाठी बस फेरी नाही. त्यामुळे  या एकमेव बसफेरी वर विद्यार्थ्यांचे शिक्षण अवलंबून आहे. त्यामुळे वसमत आगाराने या भागासाठी सकाळच्या सत्रात आणखीन एक बस फेरी सोडावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: children travelling on bus roof top to school