गळाभेटीने भरून निघाली आकाशाएवढी पोकळी

मनोज साखरे
शनिवार, 10 डिसेंबर 2016

लेकरांच्या भेटीने आनंदले कारागृहातील कैदी
औरंगाबाद - ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा, काळजाच्या तुकड्याच्या डोक्‍यावरून मायेने फिरणारे थरथरते हात यामुळे भावनिक झालेले वातावरण पाहून कारागृहाच्या कठोर भिंतींनाही पाझर फुटला. औचित्य होते कारागृहातील बंदिवानांच्या दीर्घकाळानंतर झालेल्या आपल्या लेकरांच्या गळाभेटीचे.

लेकरांच्या भेटीने आनंदले कारागृहातील कैदी
औरंगाबाद - ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा, काळजाच्या तुकड्याच्या डोक्‍यावरून मायेने फिरणारे थरथरते हात यामुळे भावनिक झालेले वातावरण पाहून कारागृहाच्या कठोर भिंतींनाही पाझर फुटला. औचित्य होते कारागृहातील बंदिवानांच्या दीर्घकाळानंतर झालेल्या आपल्या लेकरांच्या गळाभेटीचे.

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या 16 वर्षांखालील मुलांची "गळाभेट' हा उपक्रम शुक्रवारी (ता. नऊ) राबवण्यात आला. सुमारे शंभरावर कैद्यांनी आपल्या मुलांसोबत आजचा दिवस घालवला. एखाद्या चुकीपायी भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेने बापलेकरांची झालेली ताटातूट कारागृह प्रशासनाने गळाभेट या उपक्रमातून दूर केली. औरंगाबादेत प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला.

कुणी तीन, कुणी पाच, तर कुणी नऊ वर्षांपासून आपल्या चिमुकल्यांपासून, कुटुंबापासून दुरावलेले होते. काहींनी तर आपल्या लाडक्‍या पाखरांना त्यांच्या जन्मापासून बघितलेच नव्हते. फुलपाखरांसारखी भिरभिरणारी मुलं पक्ष्यांसारखी भरारी घेऊ लागल्याचे पाहून आज कैदी बापही कृतार्थ झाला होता. दूरवरून वडिलांना पाहताना मुलेही हरखून गेली होती. पाखरांच्या नकळत बाप पाणावलेले डोळे पुसत होता. बापलेकरांचा गलका जमला.

त्यांनी मुलांसाठी खाऊ आणला. तर मुलांनीही बापाला दाखवायला आपापली प्रगतीपुस्तके आणली होती. कैदी बापाची स्थिती पाहून कोवळ्या मनांनाही चिंता जाणवत होती. आपली आपबीती मूक भावनांनीच जणू ते मुलांना सांगत होते. मनात यातना असूनही मुलांच्या भेटीने ते कृतार्थ झाले होते.

सुखात आहेस ना पोरी...?
तो जरी गुन्हेगार असला, बंदिवान असला तरी त्याच्यातला बाप आज धाय मोकलून रडत होता. माना झुकल्या होत्या, हृदय कोलमडले होते, डोळे मिटले होते, हात रिक्त होते; पण अपार प्रेम ओसंडून वाहत होते. पोरी, कशी आहेस, सुखात आहेस ना... असे सासुरवाशीण मुलीला विचारताना बापाचे चिरलेले काळीज आज उघडे पडले होते.

हे क्षण असेच राहावेत...
बंदिवान बापाला भेटण्यासाठी विश्रांती, करिष्मा, रेशमा अन्‌ भैय्यासाहेब आले. त्यांची मनं हिरमुसलेली होती. बाप भेटताच ओघळलेल्या अश्रूंनी ती त्यांच्या गळ्यातच पडून होती. या क्षणांनी नाती अधिक उजळली होती. ते पाच वर्षापासून या क्षणांची वाट वाहत होते. या काळात ते आपले वडील नामदेव कांबळे यांना एकदाही भेटले नव्हते. हे क्षण असेच राहावेत, असेच जणू ते म्हणत बराच वेळ रडत होते.

वाढदिवसही झाला साजरा
दहा डिसेंबरला वाढदिवस. पण नऊ वर्षांनंतर आज साजरा करीत आहोत. अनुमती द्याल का? कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केवळ होकारच दर्शवला नाही, तर... दोन केकही आणले. केक कापताना दोन मुलांना हुंदके अनावर झाले. एकमेकांना केक भरवून त्यांनी वाढदिवस साजरा केला.

Web Title: children's visit joy jail accused