शाळा अन् अंगणवाड्यातील धुराडे बंद होणार

विकास गाढवे 
गुरुवार, 12 जुलै 2018

लातूर : शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार तर बालकांचा पोषक आहार शिजवून देण्यासाठी शाळा व अंगणवाड्यात रोज पेटणारे धुराडे आता कायमचे बंद होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्या निर्धूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून चौदाव्या वित्त आयोगातून शाळा आणि अंगणवाड्यांना गॅस जोडणी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक हजार 157 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि स्वतंत्र इमारती असलेल्या दीड हजार अंगणवाड्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.   

शालेय पोषण आहार योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन देण्यात येते. यात शाळेतच खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना खाऊ घालण्यात येते. यात बहुतांश शाळेत किचनशेडचे बांधकाम करण्यात आले तरी आहार शाळेच्या आवारात मोठ्या चुलवणावर शिजवला जातो. यासाठी बहुतांश शाळांकडून लाकडांचा इंधन म्हणून वापर केला जात आहे.

लाकडाच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान होऊन विद्यार्थ्यांना धूराचा त्रास होत आहे. शाळेत दररोज पेटणाऱ्या या धुराड्यामुळे स्वयंपाकी, शिक्षक, विद्यार्थी आणि बालकांना त्रास होत आहे. पावसाळ्यात तर आहार शिजवताना धुराचे लोट शाळेच्या बाहेर येत आहेत. यावर मात करण्यासाठी डॉ. ईटनकर यांनी सर्व शाळा व अंगणवाड्यांतून धूराची हाकालपट्टी करण्याचा निर्धार केला आहे. यातूनच आहार शिजवण्यासाठी लाकडाचा वापर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि स्वतःच्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांना चौदाव्या वित्त आयोगातून गॅसची जोडणी देण्यात येणार आहे.

तसेच आदेश डॉ. ईनटकर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये खास गॅस जोडणी देण्यासाठी तरतुद करावी, असेही त्यांनी सूचित केले आहे. यामुळे येत्या 15 जुलैपर्यंत बहुतांश शाळा आणि अंगणवाड्यांमुळे गॅसवरच आहार शिजवणे सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दोन हजार 408 अंगणवाड्या असून त्यापैकी दीड हजार इमारतींना स्वतःच्या इमारती आहेत. या अंगणवाड्यांना पहिल्या टप्प्यात गॅस जोडणी देण्याचे प्रस्तावित असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जे. एस. शेख यांनी सांगितले.    

सर्वाधिक शाळा निलंग्यात
शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी लाकडाचा वापर करणाऱ्या सर्वाधिक 183 शाळा निलंगा तालुक्यात आहेत. त्यानंतर औसा तालुक्यात 176, अहमदपूर तालुक्यात 156, लातूर तालुक्यात 150, उदगीर तालुक्यात 117, चाकूर तालुक्यात 115, रेणापूर तालुक्यात शंभर, देवणी व जळकोट तालुक्यात प्रत्येकी 65 तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात तीस शाळांत आहार शिजवण्यासाठी लाकडाचा वापर केला जात आहे. या सर्व शाळांना आता गॅस जोडणी मिळणार आहे. 

Web Title: chimni from schools and anganwadi will remove