आपुलाची दुष्काळ आपणासी; गंगापूरकरांचा नवा संकल्प

latur
latur

लातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षापूर्वी रूजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरूवात झाली. मात्र, दुष्काळ आला की जलसंधारणाची कामे, असेच रूप चळवळीला झाले. यामुळे दुष्काळ असो की सुकाळ, ही जलसंधारणाची अखंड चळवळ सुरू करण्यासाठी चौदा वर्षानंतर पुन्हा गंगापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वार्षिक वर्गणीची संकल्पना पुढे आणत पहिल्याच दिवशी पन्नास हजाराचा निधी जमवला.   

जमिनीतील पाण्याचा वारेमाप उपसा करून आपणच निर्माण केलेला दुष्काळ आपणच परतवून लावावा लागेल, या निर्धारातून दुष्काळाची अखंड सामना कररण्यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेऊन गंगापूरकरांनी पुन्हा जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यापुढे आदर्श ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. गावात नवीन वर्षानिमित्त झालेल्या बैठकीत यासाठी नियोजन करण्यात आले. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंतराव खंदाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे,  डॉ. सतीश कानडे, सरपंच बाबू खंदाडे, बच्चेसाहेब शिंदे, सुग्रीव वाघे, दगडू भेटेकर, दंडिमे गुरुजी, प्रवीण मूळे, उद्धव देशमाने, गोरोबा फुटाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंधारण अन् गंगापूर
चौदा वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संतोष पाटील यांनी दुष्काळ निवारणासाठी सहकारी संस्थांच्या नफ्यात निधीची तरतुद करण्याचा पायंडा पाडला. काही सहकारी संस्थांकडून जलसंधारण निधीही जमवला. जलसंधारणाच्या कामासाठी गंगापूरची निवड करून गटसचिवांना सोबत घेऊन सिमेंट बंधाऱ्यातील गाळाचा श्रमदानातून उपसा केला. ग्रामस्थांच्या प्रतिसादानंतर चळवळ व्यापक होऊन अनेक वर्ष टंचाईने ग्रासलेले गाव टंचाईमुक्त झाले. पाटील यांनी दिलेला वसा अनेक वर्ष ग्रामस्थांनी चालवला. गंगापूरकरांनी एकत्र येऊन सुरू केलेली जलसंधारणाची चळवळ हळूहळू जिल्हाभर पोहचली. चौदा वर्षात दुष्काळ आला की जलसंधारणाची कामे, असेच स्वरूप चळवळीला आले.    

देखभाल दुरूस्तीचा नवा फंडा
जिल्ह्यात मागील काही वर्षात गाळाचा उपसा, नदी व नाला खोलीकरण व रूंदीकरणाचे अनेक कामे झाली. मात्र, एकदा कामे झाल्यानंतर त्याकडे कोणी पाहिलेच नाही. पाऊस पडून गेला की या कामांचे महत्व संपून गेले. पुन्हा गाळ साचून कामात पाणी साठणे बंद झाले. यामुळेच कामांच्या देखभाल दुरूस्तीचा (मेंटनन्स) नवा फंडा गंगापूरकरांनी पुढे आणला आहे. चौदा वर्षानंतर गंगापुरात पुन्हा पाण्याचा वनवास सुरू झाला आहे. यामुळे पाण्याचा मोठा वापर करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांकडून एकरी किमान दोनशे रूपये तर अन्य शेतकरी तसेच घटकांकडून ऐच्छिक वार्षिक वर्गणी जमा करायची आणि त्यातून जलसंधारणाची चळवळ कायम सुरू ठेवायची, असा हा फंडा आहे. यात पूर्वीच्या कामात पाणी साठवण्याची क्षमता पुनरूज्जीवन करण्यासाठी गाळाचा उपसा डागडुजी करण्यासह वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे. 

पाटलांचा वसा तेव्हाही अन् आताही
चौदा वर्षापूर्वी पाटील यांनी जलसंधारणाच्या कामातून गंगापूरकरांशी निर्माण केलेले नाते आजही कायम आहे. सध्या सहकार मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या पाटील यांनी गंगापूरकरांनी सुरू केलेल्या अखंड चळवळीला चालना देत स्वतः पाच हजार रूपयाचा निधी दिला. पाण्याचा पिकांसाठी तसेच केवळ पिण्यासाठी वापर करणाऱ्या गावातील अनेकांनी ऐपतीप्रमाणे निधी देण्याची तयारी दाखवली. ग्रामस्थांची चौदा वर्षापूर्वी केलेली मानसिकता आजही कायम असल्याचे पाहून पाटील भारावून गेले. यामुळे त्यांनी जलसंधारणाचा नव्या रूपात दिलेला वसा पुढे नेण्यासाठी गंगापूरकर एकत्र आले आहेत. यामुळे गावात यापुढील काळात दुष्काळ पाय ठेवण्याची हिम्मत करणार नाही, असेच चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com