नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का? 

आनंद इंदानी 
गुरुवार, 2 जानेवारी 2020

बसस्थानक नसल्यामुळे लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याच्या तक्रारी कायम होत असतात. त्यामुळे बदनापूर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायम मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बदनापूर (जि.जालना) -  उघड्यावर उभे राहून ऊन, वारा व पाऊस झेलत एसटी बसची वाट पाहून त्रासलेल्या तालुक्‍यातील जनतेला आता नवीन वर्षात तरी बदनापूर येथे अद्ययावत बसस्थानक होईल, अशी भाबडी आशा आहे. बसस्थानक नसल्यामुळे लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याच्या तक्रारी कायम होत असतात. त्यामुळे बदनापूर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायम मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींनी बसस्थानक निर्मितीसाठी कृतिशील पुढाकार घ्यावा, वर्षानुवर्षे बदनापूर बसस्थानक निर्मितीच्या बाबतीत होणारी कुचंबणा थांबवावी, अशी मागणी होत आहे. 

तालुक्‍याचा दर्जा; पण मूलभूत प्रश्‍न 
बदनापूर तालुक्‍याची निर्मिती 15 ऑगस्ट 1992 मध्ये झाली होती. बदनापूरला तालुक्‍याचा दर्जा मिळाला तरी नागरी समस्या व मूलभूत प्रश्न कायम आहेत. अर्थात काही प्रमाणात विकास झाला खरा; मात्र तालुक्‍याचा चेहरा अशी ओळख असणाऱ्या बदनापूरला साधे बसस्थानक देखील होऊ शकले नाही. तालुकानिर्मिती होऊन 27 वर्षे लोटली तरी बदनापूर शहर व तालुक्‍यातील प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बसला हात दाखविण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. बसस्थानक नाही हा प्रश्न वरवर साधा भासत असला तरी सामान्य प्रवाशांना बदनापूर येथून प्रवास करताना येणारा अनुभव किती त्रासदायक आहे, याची अनुभूती येथून प्रत्यक्ष प्रवास करताना निश्‍चित येते. 

हेही वाचा : जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी

साधा बसथांबाही नाही 
बदनापूरला बसस्थानक तर सोडा साधा पाचशे लोकवस्तीला शोभेल असा बसथांबा देखील नाही. त्यामुळे एसटी बस गाठण्यासाठी नेमके कुठे उभे राहावे? असा प्रश्न प्रवाशांना पडतो. तर एसटी बसच्या चालकांनाही गाडी कुठे थांबवावी उमजत नसल्यामुळे एसटी बस कधी पुढे, तर कधी मागे थांबते. त्यानंतर सुरू होते प्रवाशांची कसरत. एसटी बसपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना हातात साहित्य घेऊन अक्षरशः पळावे लागते. त्यामुळे आबालवृद्ध, दिव्यांग व महिलांना मोठा त्रास भोगावा लागतो. कुठलाही निवारा नसल्यामुळे उघड्यावर उभे राहून प्रवास करताना ऊन, वारा, पाऊस झेलत ताटकळावे लागते. अशी अवस्था असल्यामुळे लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबविताना चालकांच्या कपाळावर आठ्या पडतात. या गाड्या थांबत नसल्याची ओरड कायम होत असते. एकूणच याचा परिणाम बदनापूर येथून लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होतो. त्यांना नाहक जालना अथवा औरंगाबाद येथे जाऊन पुढचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ खर्ची होतो. 

Image may contain: one or more people, people walking and outdoor
खासगी वाहने उभी राहत असल्यामुळे महामार्गाच्या मधोमध थांबलेली बस. 

बसस्थानकाचा प्रश्न रेंगाळलेलाच 
बदनापूर तालुक्‍याचे ठिकाण असून मागील अनेक वर्षांपासून बसस्थानक निर्मितीचा प्रश्न रेंगाळत चालला आहे. अर्थात, याला शासन व लोकप्रतिनिधींची अनास्था देखील तेवढीच कारणीभूत आहेत. बदनापूर हे जालना-औरंगाबाद महामार्गावरील महत्त्वाचा तालुका असल्यामुळे येथे जागेला सोन्याचे भाव आहेत. त्यामुळे बसस्थानक निर्मितीसाठी खासगी जागा उपलब्ध करताना शासकीय दराची अडचण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे गावाच्या जवळपास बसस्थानक निर्मितीला पर्याप्त जागा शोधून सापडत नसल्याचा आव आणला जात आहे. एकूणच अशा कारणांमुळे बदनापूरच्या बसस्थानकाचा प्रश्न रेंगाळत असल्याचा निर्वाळा आतापर्यंत निवडून आलेले आमदार व लोकप्रतिनिधी देत असतात; मात्र बसस्थानक निर्मितीची इच्छाशक्ती असल्यास बदनापूरचे बसस्थानक प्रत्यक्षात उतरणे शक्‍य आहे. 

Image may contain: 2 people
एसटी बससमोर उभे प्रवासी.

कृषी विद्यापीठाच्या जागेचा पर्याय शक्‍य 
बदनापूर येथे परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, मोसंबी संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची महामार्गालगत शेकडो एकर जमीन आहे. यापैकी दीड एकर जमिनीचा वापर बसस्थानकासाठी करता येणे शक्‍य आहे. अर्थात, यासंदर्भात कृषी विद्यापीठ व शासनाकडे तसा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी पाठविणे अपेक्षित आहे. कृषी विद्यापीठाने सध्या बंद अवस्थेत असलेला बीजप्रक्रिया केंद्र अथवा हत्ती नाल्यालगत असलेली मोसंबी संशोधन केंद्राची दीड एकर जागा दिल्यास बसस्थानकाचा प्रश्न सुटू शकतो. 

बदनापूर बसस्थानक निर्मितीसाठी सर्वप्रकारे प्रयत्न करतोय. बसस्थानकाचा प्रश्न विधानसभेत मांडला. तत्कालीन परिवहनमंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. दुधना अपर मध्यम प्रकल्पाच्या कार्यालयाशेजारील जागाही निश्‍चित झाली होती; मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या निकषात ही जागा बसली नाही. अर्थात, बदनापूरला अद्ययावत बसस्थानक निर्मितीचे वचन जनतेला दिले असून ते लवकरच पूर्ण करणार आहे. 
नारायण कुचे, आमदार, बदनापूर 

बदनापूर बसस्थानक निर्मितीचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. येथे अद्ययावत बसस्थानक नसल्यामुळे उघड्यावर उभे राहून एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबत नाहीत. शासन आणि लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. 
रामभाऊ उनगे, 
अध्यक्ष, शेतकरी क्रांती सेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Inconvenience without bus stand in Badnapur