
कोणत्याही परिस्थितीत लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जनतेने घाबरून न जाता दक्षता घ्यावी. शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात संशयित रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.२२) दिल्या.
लातूर : कोणत्याही परिस्थितीत लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. जनतेने घाबरून न जाता दक्षता घ्यावी. शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात संशयित रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.२२) दिल्या.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ११ मार्चपासून परदेशाहून येणारे प्रवासी, मुंबई आणि पुणे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून येणारे नागरिक आणि कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. लातूरातील ३२ रुग्णांचे तपासणीतील नुमने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी २८ रुग्णांचे नमुने नकारात्मक (निगेटिव्ह) आले असून शनिवारी (ता. २१) पाठवण्यात आलेल्या चार नमुन्यांचा अहवाल रविवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षित आहे. या ३२ जणांपैकी सातजण पुण्यातील एका कोरोना सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.
वाचा ः औशातील रस्त्यावर शुकशुकाट, जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद
मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे १४ दिवस विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार रुग्ण मुंबईतून लातूर जिल्ह्यात आले होते. या रुग्णांचा सकारात्मक रुग्णाशी संपर्क आल्याचे लक्षात आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या चारही जणांचा अहवाल नकात्मक आला आहे. या रुग्णांचेही त्यांच्या घरी १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले आहे.
पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेल्या रुग्णांपैकी दोन जण ४ मार्चला दुबई येथून प्रवास करून आले होते. या रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल. लातूर जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या कोरोना विषयक तपासणीच्या कामकाजाचा दररोज आढावा घेतला जात आहे. तपासणी यंत्रणेत कोणतीही कमतरता राहू नये, याचीही दक्षता घेतली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.