पर्यावरण दिनापासून धावणार शहर बससेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

औरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील.

औरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील.

शहरातील मार्ग आणि भाडे ठरवणे, त्यांना आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आदी मुद्यांवर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता. 19) सांगितले. शहरातील बस वाहतूक सेवेचा भार आतापर्यंत राज्य एसटी महामंडळ वाहत आहे. काही काळ तत्कालीन महापौर किशनचंद तनवाणी यांच्या कार्यकाळात अकोला ट्रान्स्पोर्ट कंपनीने शहर बससेवा चालवली. परंतु काही अनियमिततांमुळे ती बससेवा बंद पडली. तेव्हापासून आजतागायत महापालिकेने सिटी बस चालवण्याचा कधी विचारही केला नाही. आताही एसटी महामंडळ नाखुशीनेच शहर बससेवा चालवत आहे. अशा वेळी शहरातील एक संस्था शहर बससेवा देण्यासाठी पुढे आली आहे.

महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी संस्थेशी सकारात्मक चर्चा अंतिम झाल्याशिवाय त्यांचे नाव जाहीर करणे सयुक्‍तिक होणार नसल्याचे सांगितले. महापालिकेने या संस्थेला 35 आसनी बसेस शहरातून चालवण्यात याव्यात, अशी सूचना केलेली आहे.

महापालिकेतर्फे या संस्थेला केवळ ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे. याशिवाय काही छोट्या मोठ्या आवश्‍यक सोयीसुविधा द्यायच्या आहेत. शहर बस चालवायची झाल्यास महापालिकेने आपली रॉयल्टी माफ करावी, आरटीओचा टॅक्‍स माफ करुन द्यावा, बसेसच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा काही मागण्या या संस्थेने केलेल्या आहेत. परंतु काही विषय महापालिकेच्या कार्यकक्षेबाहेरचे असल्याने आरटीओ व अन्य शासकीय कार्यालये यांनाही या बैठकीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, महापौर भगवान घडमोडे म्हणाले, की सिटी बससेवा सुरू होणे अतिशय गरजेचे आहे. शहरवासीयांना ही सेवा सुरू व्हावी असे वाटते. त्यामुळे आपण स्वत: पुढाकार घेऊन पाठपुरावा करीत आहोत आणि ही सेवा सुरू होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील.

सवलतीच्या दरात प्रवासासाठी प्रयत्न
यावेळी संस्थेने शहरातून सिटी बसेस चालवण्यास अनुकूलता दर्शवल्यास एसटी महामंडळाकडून त्यांचे मार्ग आणि त्यांचे दरपत्रक मागवून घेऊ व त्याआधारे या संस्थेला मार्ग व दर ठरवून देऊ. शालेय विद्यार्थी आणि वयोवृध्द प्रवासी तसेच स्वातंत्र्यसैनिक आदींना सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: city bus service at environment day