शहर बसची वारी आता २४ जानेवारी!

City-Bus
City-Bus

औरंगाबाद - शहर बससेवेचे लोकार्पण करून दोन आठवडे उलटले आहेत; मात्र अद्याप बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. आता २४ जानेवारीचा नवा मुहूर्त काढण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. आठ) आणखी २३ बस शहरात दाखल होणार आहेत.

स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने शंभर बस खरेदी केल्या असून, तीन टप्प्यांत टाटा कंपनीकडून या बस पुरविल्या जाणार होत्या. पहिल्या दोन टप्प्यांत प्रत्येकी ३०, तर तिसऱ्या टप्प्यात ४० बस येणार होत्या. त्यानुसार २३ डिसेंबरचा बससेवेचा मुहूर्त काढण्यात आला. मोठा गाजावाजा करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. २४ जानेवारीपासून बस रस्त्यावर धावतील अशी नागरिकांना अपेक्षा होती; मात्र अद्याप प्रतीक्षाच सुरू आहे. आता २४ जानेवारीला या बस रस्त्यावर धावतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. सात) सांगितले. 

२४ मार्ग, ३७० थांबे 
बससाठी २४ मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत. २८ पैकी २४ बस रस्त्यावर धावणार आहेत. चार बस राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी एक बस शहर दर्शनासाठी वापरली जाईल. १३ बस शाळा-महाविद्यालयांच्या वेळांशी निगडित राहतील, तर ११ बस नागरिकांसाठी धावतील. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सिटी बस सोडण्यात येतील. सिडको, चिकलठाणा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय नियंत्रण कार्यालय या चार ठिकाणी बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ३७० ठिकाणी शहर बस थांबे असतील. 

कार्यालयासाठी चार जागा  
बससेवा एसटी महामंडळामार्फत चालविली जाणार आहे. चालक-वाहकांसाठी नियंत्रण कार्यालय सुरू करण्यासाठी रेल्वेस्टेशन रोडवरील पर्यटन कार्यालयामागील हॉल, राखी टॉवरमागील जागा, आमखास मैदानाजवळील जागा, मौलाना आझाद संशोधन केंद्रातील हॉल या चार जागांपैकी एक जागा निश्‍चित केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

१४ ला निविदा होणार अंतिम 
बसच्या वेळापत्रकासाठी ३७० पोल बसविले जाणार असून, त्याकरिता निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा दाखल करण्याची १४ जानेवारी अंतिम तारीख आहे. बसमध्ये अपंगांसाठी चार सीट, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येकी दोन सीट, महिलांसाठी चार सीट आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com