Jalna News: पालिकेसमोर वसुलीकडे आव्हान,शंभर कोटींचा थकला कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

Jalna News: पालिकेसमोर वसुलीकडे आव्हान,शंभर कोटींचा थकला कर

Jalna News: औद्योगिक आणि व्यापारी शहर म्हणून जालना शहराची ओळख आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

मात्र, दुसरीकडे नगरपालिकेला करामुळे मिळणारा कोट्यवधीचा महसूल नागरिकांकडेच थकीत आहेत. आजघडीला पालिकेचा जालनेकरांकडे तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक कर थकीत आहे.

त्यामुळे हा थकीत कर वेळेत वसुल करण्याचे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे. जालना शहराचा मोठा विस्तार झाला आहे. प्रामुख्याने अंबड चौफुली, जिल्हा कारागृह रोड, राजपूतवाडी, अंबड चौफुली- मंठा चौफुली बायपास,

मंठा चौफुली, चंदनझिरा या भागांसह राजूर रोड, नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्हैय्यानगर भागात लोकवस्तीचा विस्तार होत आहे. त्यामुळे घरांची संख्या वाढत चालली आहे.

नगरपालिकेच्या करात ही भर पडणे अपेक्षित आहे. मात्र, नगरपालिकेकडून कर आकारणी नोटिस दिल्यानंतर ही शहरातील अनेक मालमत्ताधारक काणाडोळा करत आहेत. पालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवत वर्षानुवर्ष कर थकीत ठेवत आहेत.

त्यामुळे जालना नगरपालिकेचा थकीत कर हा तब्बल १०० कोटी ६७ लाख दोन हजारांवर जाऊन पोहचला आहे. या थकीत कराच्या ओझ्याखाली पालिका दबली आहे.

वसुलीसाठी केवळ दोन पथक

जालना शहरातील मालमत्ताधारकांकडील थकीत कराची वसुली करण्यासाठी नगरपालिकेने केवळ दोन पथकांची स्थापन केली आहे. प्रत्येक पथकात एक अधिकारी, एक सहायक अधिकारी आणि तीन कर्मचारी असे पाच जण आहेत.

मात्र, या दोन पथकांवर ही कर वसुली होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे नगरपालिकेचा कर विभाग अजून दोन पथके स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, तरी देखील थकीत कर वसुल होणे कठीण असल्याचे चित्र आहे.

असा आहे थकीत कराचा भार

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान जालना नगरपालिकेला शहरातील मालमत्ताधारकांकडून ३० कोटी ६३ लाख ६१ हजारांचा कर वसुल करणे आहे.

तर मार्च २०२२ अखेरपर्यंत मागील थकीत कराची रक्कम ही तब्बल ७० कोटी तीन लाख ५६ हजार रुपये आहे. त्यामुळे चालु करापेक्षा वर्षानुवर्ष थकीत राहिलेल्या कराची रक्कम दुपटीपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.

आत्तापर्यंत पावणेआठ कोटींची वसुली

नगरपालिकेला यंदा १०० कोटी ६७ लाख दोन हजारांचा कर वसुल करणे आहे. मात्र, नगरपालिकेच्या अहवालानुसार ता.३१ जानेवारीपर्यंत सात कोटी ७६ लाख २७ हजारांचा कर वसुली केली आहे.

यात वर्षानुवर्ष थकीत असलेल्या करापैकी पाच कोटी २३ लाख ५९ हजारांचा कर वसुल करण्यात आला आहे. तर चालु वर्षातील करापैकी केवळ दोन कोटी ५२ लाख ६८ हजारांचा कर वसुल करण्यात आला आहे.

मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू

नगरपालिकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे. परिणामी कर वसुली करताना राजकीय हस्तक्षेपाला मर्यादा येणार असल्याने नगरपालिकेच्या कर वसुली पथकाला काम करताना कमी अडसर होणार आहे.

त्यानुसार नगरपालिका प्रशासनाकडून थकीत करापोटी मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सुरवात केली असून मंगळवारी (ता.सात) पाच मालमत्ता जप्त केल्या आहेत.