शहरातील प्रलंबित विकासकामे 100 दिवसांत मार्गी लावणार - संभाजी पाटील निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

लातूर - केंद्र-राज्यासह पालिकेतील सत्ता उपभोगणाऱ्या कॉंग्रेसने प्रश्‍न सोडविण्याऐवजी प्रश्‍न वाढविण्याचे काम केले. सत्ता असूनही प्रश्‍न सोडविण्याची इच्छाशक्ती नसलेल्या कॉंग्रेसने खोटी आश्‍वासने देऊन मतदारांना दिलेल्या जाहीरनाम्याला हरताळ फासला. त्यामुळे शहरात विकासकामे रखडली. मतदारांनी परिवर्तन करून भाजपला संधी दिल्यास 100 दिवसांत प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. लातूर महापालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्र. पाच, तीन व 12 मधील भाजपा-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमधून पालकमंत्री निलंगेकरांनी लातूरकरांशी संवाद साधला.

प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, अख्तर मिस्त्री, हमीद शेख, विवेक बाजपाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

श्री. निलंगेकर म्हणाले की, निवडणुका आल्या की पुन्हा-पुन्हा तेच जाहीरनामे लातूरकरांसमोर आणून कॉंग्रेस नेत्यांनी खोटी आश्‍वासने दिली. शहराच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी ते वाढविण्याचेच काम केले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवू, शादीखाने बांधू, बससेवा सुरू करू व लातूरकरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ, अशी आश्‍वासने कॉंग्रेसने दिली होती; मात्र यांपैकी एकाही आश्‍वासनाची पूर्तता केलेली नसून लातूरकरांना केवळ झुलवत ठेवले आहे. देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले असून हे परिवर्तन लातूर जिल्ह्यापर्यंतसुध्दा पोहोचले आहे. भाजप विकासाच्या मुद्‌द्‌यावर मतदारांसमोर जात असल्याचे सांगत पालकमंत्री निलंगेकरांनी या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन घडवून भाजपला संधी द्यावी असे आवाहन केले. मतदारांनी परिवर्तन घडविल्यास शहरातील प्रलंबित विकासकामे 100 दिवसांत मार्गी लावू, असे सांगत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विविध चौकांमध्ये 45 दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, अशी हमी लातूरकरांना दिली. त्याचबरोबर कॉंग्रेसकडून तीन वेळा शादीखान्याचे भूमिपूजन करूनही ते पूर्ण करू शकलेले नाही; मात्र भाजपाला संधी दिल्यास 45 दिवसांतच शादीखान्याचा प्रश्‍न मार्गी लावू असे ते म्हणाले. गतवर्षीची भीषण पाणीटंचाई निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचे पुन्हा एकदा सांगत राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही केवळ स्वार्थापोटी निविदा न काढण्याचा उद्योग कॉंग्रेसने केला आहे; मात्र भाजप फक्त आणि फक्त लोकहितालाच प्राधान्य देणार असून लातूरकरांना मुबलक पाणी 100 दिवसांत उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकरांनी दिली.

या तिन्ही प्रचार सभांना प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विशेष म्हणजे महिलांची संख्या लक्षवेधी ठरली. या प्रचारसभांना झालेली गर्दी पाहून निश्‍चितच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकण्यास सुरवात झालेली असेल, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होऊन आता भाजपाचा विजय निश्‍चित असल्याचे ऐकण्यास मिळत होते.

Web Title: city pending work complete in 100 days