चारच "ऑक्‍सिजन हब'वर शहराचा ताण!

आदित्य वाघमारे
बुधवार, 17 मे 2017

औरंगाबाद - शहरात वृक्षांची संख्या घटत आहे. दाट झाडांची लागवड करण्यासाठी कधी प्रयत्नच न झाल्याने आता शहरात चारच "ऑक्‍सिजन हब' शिल्लक राहिले आहेत. ऑक्‍सिजनची मुक्‍तहस्ते उधळण करणाऱ्या देशी झाडांना बाद करून परदेशी झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन हबना बळकटी कशी मिळणार, हा प्रश्‍न आहे.

औरंगाबाद - शहरात वृक्षांची संख्या घटत आहे. दाट झाडांची लागवड करण्यासाठी कधी प्रयत्नच न झाल्याने आता शहरात चारच "ऑक्‍सिजन हब' शिल्लक राहिले आहेत. ऑक्‍सिजनची मुक्‍तहस्ते उधळण करणाऱ्या देशी झाडांना बाद करून परदेशी झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन हबना बळकटी कशी मिळणार, हा प्रश्‍न आहे.

औरंगाबाद शहराची लोकसंख्या वाढत असून, त्याप्रमाणे शहराचाही विस्तार वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला प्राणवायू देणाऱ्या वृक्षसंपत्तीच्या लागवडीकडे मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरात सध्या केवळ चारच दाट झाडी असलेले ऑक्‍सिजन हब शिल्लक राहिले आहेत. या नैसर्गिक संपत्तीवर शहराचा ताण पडत आहे. परिणामी शहराची हवा अशुद्ध होऊ लागली आहे. त्यातून श्‍वसनाचे विकार बळावत आहेत.

शहराच्या विविध भागांत विरळ झाडे असली, तरी त्यापासून मनुष्याला मिळणारा प्राणवायू परिपूर्ण मिळेल असे नाही. लहान झुडपे धूळ शोषून घेत हवा शुद्ध करण्याचे काम करतात. मोठ्या झाडांसह या झुडपांचीही लागवड व्हायला हवी. वेलीही वाऱ्यात असलेले विषारी वायूही शोषतात. ज्यामुळे हवा शुद्ध होते. वृक्ष, झुडपे आणि वेलींचा समावेश असलेली चिकलठाणा एमआयडीसी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, हिमायतबाग आणि एमजीएम आवार ही चारच ठिकाणे आहेत. औरंगाबादेत गेल्या पन्नास वर्षांत कधीच सुनियोजित पद्धतीने झाडांची लागवड झाली नाही. एकट्या नाशिकमध्ये 32 लाख झाडे असताना औरंगाबादेत झाडांची संख्या किती, हे मोजण्याची तसदीही घेतली न जाणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

झाडे येणार कुठून?
आपल्या मातीत घट्ट रुजलेल्या वडाच्या झाडाकडून मिळणाऱ्या ऑक्‍सिजनचे प्रमाण मोठे आहे. वयाची साठी गाठलेल्या एका वडाच्या झाडाकडून पाच हजार माणसांना आवश्‍यक असलेले ऑक्‍सिजन प्राप्त होते. रस्त्यांवरील झाडे तोडून आपघात थांबले नाहीत आणि वाहतुकीची कोंडीही जगाच्या पाठीवर कुठेच सुटलेली नाही. वाहनांची संख्याच वाढली असताना पैठण रोडवरील झाडांची कत्तल करून आपण काय साध्य करतो आहोत, याचा विचार व्हायला हवा. झाडांची कत्तल करीत असताना नव्याने लागवडीचे नियोजन तरी असायला हवे. त्याची चर्चाही होताना दिसत नाही. मग झाडे येणार तरी कुठून, हा प्रश्‍न कायम आहे.

परदेशी झाडे "अनफिट'
औरंगाबादेतील हवामान लक्षात घेता येथील मातीत देशी झाडांची लागवड यशस्वी होते; मात्र महागडी परदेशी झाडे अनफिट ठरतात. वेड्याबाभळीची झाडे आपल्याला काटेरी वाटत असली, तरी त्यांच्यातून बाहेर पडणारा ऑक्‍सिजन परदेशी झाडांपेक्षा अधिक असतो. कार्बन सायकल अधिक चांगल्याप्रकारे ते पूर्ण करतात. केवळ शोभा वाढविणारी झाडे लावून शहराच्या लोकांच्या आरोग्याशी खेळ करायचा की येथून श्‍वसनाचे आजार दूर करायचे, याचा निर्णय शहरवासीयांसह प्रशासकीय यंत्रणांनी करायला हवा, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

औरंगाबाद शहरात झाडांची लागवड शोभेचा किंवा मनोरंजनाचा भाग म्हणून होता कामा नये. झाडे लावायची आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या लावण्यात काही अर्थ नाही. शहरात गेल्या अनेक वर्षांत सुनियोजित पद्धतीने झाडांची लागवड झालेली नाही. येत्या पावसाळ्यापासून तरी हा विषय मनावर घ्यायला हवा. शहरात आता झाडे असलेला केवळ साडेचार टक्‍क्‍यांपेक्षा कमी भूभाग शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे कुऱ्हाडबंदीही व्हायलाच हवी.
- डॉ. किशोर पाठक, झाडांचे अभ्यासक.

Web Title: city pressure on four oxygen hub