नव्या पाणी योजनेत शहराचे सहा विभाग

Water
Water

औरंगाबाद - नव्या पाणीपुरवठा योजनेत शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल सुचविण्यात आला आहे. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २५४० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार असली तरी नक्षत्रवाडी येथून स्वतंत्र सहा लाइनद्वारे (तीन लाइन जुन्या) शहराला पाणीपुरवठा केला जाईल. त्यासाठी नक्षत्रवाडी येथील डोंगरावर आणखी एक एमबीआर बांधला जाईल, असे सोमवारी (ता. एक) महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. 

नव्या पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करताना आयुक्‍त म्हणाले, ‘‘शहराची २०५२ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून योजना तयार करण्यात आली आहे. त्यात जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य पाइपलाइन, शहरात २१०० किलोमीटरच्या अंतर्गत पाइपलाइन, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे यासह इतर कामांचा समावेश आहे. योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार असून, पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. त्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर ६०४ एमएलडी पाणी मिळेल.

महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग किलोमीटर एवढे आहे. या सर्व भागांत एकूण २१०० किलोमीटरच्या अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात येतील. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक ५३३ कोटी रुपये हे मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढील पाइपलाइनसाठी लागणार आहेत.’

५६ एमएलडीची योजना होणार बंद
शहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जीर्ण झाल्या आहेत. १०० एमएलडी आणि ५६ एमएलडी अशा योजना आहेत. नवीन योजना अस्तित्वात आल्यानंतर ५६ एमएलडीची जुनी योजना बंद करण्यात येणार आहे; तर त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना आणि १०० एमएलडीची पाणीपुरवठा योजना या दोनच योजना सुरू राहतील. 

हर्सूलचे पाणी वगळले 
नव्या योजनेत हर्सूलसह शहर परिसरातील नैसर्गिक स्रोतांचा विसर पडला आहे. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह माजी महापौर त्र्यंबक तुपे, भगवान घडामोडे, राजू शिंदे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांच्यासह नगरसेवकांनी आक्षेप घेतला व सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. राजेंद्र जंजाळ यांनी नव्या योजनेबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले. 

योजनेची ठळक वैशिष्ट्ये 
  १६७३ कोटी रुपयांचा एकूण खर्च. 
  ५३३ कोटी रुपये हे मुख्य जलवाहिनीसाठी खर्च. 
  २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी खर्च. 
  २५४ कोटी पाणी शुद्धीकरण केंद्राचा खर्च.
  जुन्या २७ टाक्‍या वापरणार, नव्या २७ बांधणार. 
  नक्षत्रवाडी येथे ६६० मीटर उंचीवर नवा एमबीआर. 
  ७०० किलोमीटरच्या नव्या अंतर्गत पाइपलाइन. 
  विजेची बचत होणार. ४५१ एमएलडीसाठी ८.८ कोटी महिन्याला बिल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com