शहर वाहतुकीत पोलिस घालणार लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

काय होणार कारवाई?
बेशिस्त रिक्षाचालक, वाहतूक नियम तोडणारे, हेल्मेट न वापरणारे वाहनधारक, यासोबतच ट्रिपलसीट, राँगसाईड वाहन, सिग्नल तोडणे, अल्पवयीन वाहनचालक, अल्पवयीन रिक्षाचालक, विनाक्रमांक वाहन, सीटबेल्ट न लावणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, मोबाईलवर बोलणे अशा विविध प्रकारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून केसेस करण्यात येणार आहेत. त्यामुळेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

औरंगाबाद - वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी बेशिस्त व बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ‘सकाळ’ने गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीच्या बेशिस्तीचा विषय लावून धरल्यानंतर वाहतूक शाखेने व्यापक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरामध्ये वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. चौकाचौकात वाहनधारक सिग्नल तोडून पळून जात आहेत. स्टॉपलाइन आणि झेब्रा क्रॉसिंग तर नावालाच राहिल्या आहेत. वाहनधारकांच्या आक्रमणामुळे नागरिकांना झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग होत नाही. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटचा विसर पडला आहे. पोलिसांचे लक्ष नसल्याने वाहनधारकांची हेल्मेटची सवय मोडत चालली आहे. या सर्वच बाबींच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून ‘सकाळ’ने बातम्यांच्या माध्यमाने हा विषय चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळेच गुरुवारी (ता. २५) वाहतूक शाखेने व्यापक मोहीम सुरू करण्याची भूमिका जाहीर केली आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डी. एन. मुंढे यांनी वाहतूक शाखेच्या कारवाईची माहिती दिली आहे.

Web Title: City Transport Watch by Police