अनुदान घेऊन घर न बांधणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभधारकांनी घरकुलाचे अनुदान घेऊन बांधकाम केले नाही अशा लाभधारकांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लातूर ः महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभधारकांनी घरकुलाचे अनुदान घेऊन बांधकाम केले नाही अशा लाभधारकांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.लातूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेची आढावा बैठक बुधवारी (ता.15) घेण्यात आली.

त्यावेळी त्यांनी आदेश दिला. बैठकीस उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, आयुब मनियार, अहेमदखॉं पठाण, सचिन मस्के, हनुमंत जाकते, उपायुक्‍त संभाजी वाघमारे, हर्षल गायकवाड उपस्थित होते.या बैठकीत रमाई घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार 986 घरकुलांपैकी एक हजार 658 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. एक हजार 147 घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. 155 लाभधारकांचे घरकुल बांधकाम अद्याप सुरू झाले नाही, अशा लाभधारकांशी संपर्क करून लवकरात लवकर घरकुलांचे बांधकाम सुरू करावे, असे श्री. गोजमगुंडे यांनी आदेश दिले.

हेही वाचा - विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निमयानुकूल करणे या शासन निर्णयान्वये शहरातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून समितीपुढे अहवाल सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे बांधकाम परवाने तत्काळ देऊन लाभधारकांना कार्यादेश वाटप करावेत, अशी सूचना उपमहापौर बिराजदार यांनी केली.

हेही वाचा - ‘लायन्स’ देते विस रुपयात नवीदृष्टी

रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभधारकांना हप्ते वाटपास विलंब होत आहे, असे श्री. साबदे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनामार्फत लवकरात लवकर लाभधारकांना हप्ते वाटप करण्यात येतील; तसेच प्रत्येक महिन्याला लोकशाही दिनाप्रमाणे घरकुल योजनेचा आढावा महानगरपालिका स्तरावर घेण्यात येईल, असे उपायुक्‍त श्री. गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civil Charges For Not Using Home Subsidy Latur