गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

बाळासाहेब लोणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लोकांना पिण्याचे पाणी नसल्याने दुष्काळात नागरिकांचे मोठे हाल होतात. मात्र, अनेक ग्रामसेवक, तलाठी व विविध अधिकारी कामांत विविध कारणे सांगून हलगर्जीपणा करीत आहेत हे वास्तवसत्य आहे. अशांवर कडक कारवाई झालीच
पाहिजे.

- किरण पाटील डोणगावकर (जिल्हा सचिव, काँग्रेस)

गंगापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महीने उलटले तरीही तालुक्यात दुष्काळाच्या झळा संपल्या असून ९२ गावांत ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. १४ गावांत ३२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या निवारणासाठी
टँकर हाच मोठा आधार ठरतो आहे. जून आणि जुलै असे पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. मात्र, तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस होऊ शकलेला नाही. त्यामुळे टँकरची मागणी वाढतच आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत येथील पंचायत समितिमार्फत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खरीप हंगामावर भिस्त

तालुक्यात दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा भीषण दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. संपूर्ण जुलै आणि आता ऑगस्ट कोरडा जात असल्याने हजारो हेक्टरवरील उभे पीक धोक्यात आले आहे. फळबागाही सुकू लागल्याने शेतकरी हताश झाला आहे. खरीप
हातचा गेल्यास शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. कारण सहा सात वर्षांत शेतीतून नफ्याऐवजी तोटाच सहन करावा लागणाऱ्या शेतकऱ्याची यंदाच्या खरीप हंगामावर मोठी भिस्त होती.

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसले असताना दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव लाल फितीत अडकवले जात आहेत. येथील भीषण पाणीटंचाईचा विचार करून
गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत

- बद्रीनाथ बारहाते (माजी सभापती, खरेदी विक्री)

Web Title: Civil harassment in Gangaapur taluka due to water shortage