ग्राहक मंचाचा स्टेट बॅंक ऑफ हैदराबादला दणका

सुषेन जाधव 
शनिवार, 19 मे 2018

औरंगाबाद : "एटीएम'मधून कमी पैसे मिळाल्याची तक्रार करूनही तिची दखल न घेतल्याने स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद यांनी अर्जदाराला रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे 100 प्रतिदिन रुपये दंड या हिशेबाने 47 हजार 700 रुपये आणि तक्रार खर्चापोटी एक हजार रुपये 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोळे आणि संध्या बारलिंगे यांनी दिले.

समाधान भगवान वानखेडे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, समाधानने एक ऑक्‍टोबर 2016 रोजी एसबीएचच्या एटीएममधून एक हजार पाचशे रुपये काढले. मात्र, मशीनमधून केवळ 1100 रुपयेच मिळाले. त्याने या संदर्भात चार ऑक्‍टोबररोजी बॅंकेकडे तक्रार दाखल केली. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार अशा प्रकरणात सात दिवसांत तक्रारींचे निराकरण करणे आवश्‍यक असताना बॅंकेने दुर्लक्ष केले.

अर्जदाराने वारंवार संबंधितांकडे तक्रार अर्ज केले, विनंती केली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पाच फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्या खात्यात 400 रुपये वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सेवेतील त्रुटी, मानसिक त्रास, तक्रार खर्च, कायद्यानुसार भरपाई मिळण्याची विनंती अर्जदाराने केली. सुनावणीवेळी प्रतिवादी बॅंकेला नोटीस देण्यात येऊनही त्यांच्यातर्फे कोणीही मंचात हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने एकतर्फी सुनावणी घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तब्बल 477 दिवस बॅंकेने तिचे निराकरण केले नाही. त्यामुळे प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाईस तक्रारदार पात्र ठरत असल्याचे मत मंचाने नोंदविले आणि वरीलप्रमाणे आदेश दिले.
 
Web Title: Clash of consumer forum State Bank of Hyderabad