दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

औरंगाबाद - पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीवर परिचयातील दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा खळबळजनक प्रकार पाच डिसेंबरला रात्री विद्यापीठ परिसरातील सोनेरी महलजवळील निर्जनस्थळी घडला. या अत्याचाराची व्हिडीओ शूटिंग करून ती सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तरुणांनी तिच्याकडून चार हजार रुपये उकळले. मुलीने भावाकडे आपबिती सांगितल्यानंतर दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या संशयित अल्पवयीन ताब्यात आहे.

शहरात राहणारी पीडित विद्यार्थिनी एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. विकास ज्ञानेश्वर क्षीरसागर व एका सतरा वर्षीय मुलासोबत तिची ओळख आहे. अल्पवयीन मुलगा तिला भेटण्याबाबत मोबाईलवर संपर्क करून आग्रह धरत होता. तिने ही बाब विकासला सांगितली. त्यानंतर विकासने त्या मुलाला समजावून सांगू, असे आश्‍वासन दिले.

त्यानंतर विकासने तिला पाच डिसेंबरला औरंगपुरा येथे बोलावले. तेथून तिला सोनेरी महल येथे चल, आपण तिथेच बोलू असे म्हणत दुचाकीवर बसविले. तिघे सोनेरी महलजवळील एका ठिकाणी गेले. मात्र विकासची नियत बदलली. त्याने व त्याच्या सोबतच्या मुलाने विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी केली. तिने विरोध करीत घरी सोडण्याचा आग्रह केला. त्यानंतर दोघांनी तिच्यावर जबरदस्ती केली व मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर तिला औरंगपुरा भागातील भाजीमंडीत सोडून दोघे पसार झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार सिटीचौक पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार, बाललैंगिक शोषण विरोधी कायदा व खंडणी उकळल्याच्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, क्रांतीचौक पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलासह अन्य एका तरुणाला अटक केली असून, सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

धमकी देत उकळले पैसे
बलात्कारानंतर दोन दिवसांनी विद्यार्थिनीला दोघांनी फोन करून पाच हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हॉटस्‌अप, फेसबुक या सोशल साइटवर टाकून व्हायरल करण्याची त्यांनी धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी विद्यार्थिनीने दोन वेळा दोन-दोन हजार रुपये दोघांना दिले.

भावाला सांगितली आपबिती..
विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकाराची बाब तिच्या चुलत भावाला समजली. त्याने बहिणीला विश्‍वासात घेतल्यानंतर तिने त्याला आपबिती कथन केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तिचा जबाब घेऊन पोलिसांनी हे प्रकरण सिटीचौक पोलिसांकडे वर्ग केले.

निर्जनस्थळांकडे दुर्लक्ष..
गोलवाडी, सुंदरवाडी, अशा निर्जनस्थळी मुलींवर झालेल्या बलात्कारांच्या घटनेनंतर न्यायालयाने अशा ठिकाणी विद्युत दिवे लावून गस्त वाढविण्याचे तसेच उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पण अशा सुमारे दीडशे निर्जनस्थळांकडे पोलिस विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

सोनेरी महलालगत दीड महिन्यापूर्वी घडला प्रकार
अत्याचाराची केली व्हिडिओ शूटिंग
सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्याची धमकी देत उकळले चार हजार
संशयित अल्पवयीन अटकेत

Web Title: Class tenth girl student raped!