हात धुवा उपक्रमाचा स्वच्छता मिशनकडूनच धुव्वा

लोहारा (ता. उदगीर) : जागतिक हात धुवा दिनानिमित्त मंगळवारी धुतलेले हात दाखविताना जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थिनी.
लोहारा (ता. उदगीर) : जागतिक हात धुवा दिनानिमित्त मंगळवारी धुतलेले हात दाखविताना जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थिनी.

लातूर : कागदावरच स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती शाळा व या शाळांत किती विद्यार्थी आहेत, याची माहिती नसल्याचे मंगळवारी (ता. 15) पुढे आले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या एक हजार 278 शाळांत उपक्रम राबविला गेला. यात एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुण्याची पद्धत समजावून घेत हात धुतले.

मात्र, मिशनने केवळ चाळीस हजार विद्यार्थ्यांनी हात धुतल्याचा दावा करून चांगल्या उपक्रमाचा धुव्वा उडविला. वर्षभर कॉपीपेस्ट उपक्रम राबविणाऱ्या मिशनने शाळांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या उपक्रमाचा चुकीचा दावा केल्याने शिक्षकांत नाराजी पसरली आहे. 
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने वर्षभर वैयक्तिक व सामुदायिक स्वच्छतेचे उपक्रम राबविले जातात. यात स्वच्छतेशी निगडित असलेल्या व वर्षातून एकदाच येणाऱ्या जागतिक हात धुवा दिनानिमित्त सर्व शाळांत कार्यक्रम घेण्यात येतो. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे स्वच्छतेबाबत जागरूक असल्याने शाळांकडून हा कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने राबविला जातो.

मंगळवारी जिल्ह्यातील सर्व एक हजार 278 शाळांत हा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. ईटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा (ता. उदगीर) येथील जिल्हा परिषद प्रशालेत कार्यक्रम घेण्यात आला. याची माहिती प्रसारमाध्यमांना देताना जिल्ह्यातील बाराशे शाळांतील चाळीस विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुतल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने दिली आहे. जिल्हा परिषद शाळांत एकूण एक लाख 20 हजार 995 विद्यार्थी असताना ऐंशी हजार विद्यार्थी अचानक गेले कुठे? हात धुणे नको, म्हणून विद्यार्थी गैरहजर राहिले की काय, असा प्रश्न सर्वांना पडला. प्राथमिक शिक्षण विभागाने मात्र सर्व शाळांत हा कार्यक्रम घेतल्याचे व सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग दिल्याचे स्पष्ट केले.

मंगळवारच्या कार्यक्रमापूर्वी हात धुवा दिनानिमित्त बाराशे शाळांतील एक लाख विद्यार्थी तसेच ग्रामस्थ हात धुणार असल्याची माहिती मिशनने प्रसारमाध्यमांना दिली होती. विद्यार्थ्यांची संख्या अशी अचानक कमी झाल्याने सर्वांनाच कोडे पडले. जिल्हा परिषदेत कमी विद्यार्थ्यांची विचारपूस सुरू झाली. 

उपक्रमाला कॉपीपेस्टचे ग्रहण 
मंगळवारच्या हात धुवा दिनाच्या चांगला उपक्रमाला कॉपीपेस्टचे ग्रहण लागल्याचे पुढे आले. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिशनकडून कॉपीपेस्ट करून प्रसार माध्यमांना पाठविली जाते. त्यात मागील वर्षीच्या माहितीत थोडाफार बदल करून माहिती दिली जात असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्हा परिषद शाळांनी राबविलेल्या उपक्रमाबाबत मिशने कचखाऊ भूमिका घेतल्याने नाराजी पसरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com