मुख्यमंत्री म्हणतात, 'सर्व समस्या सोडविल्याचा दावा नाही पण...'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मुजोरी जनतेने विरोधकांना नापास केले. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी पेनला दोष देतो. त्याप्रमाणे ते ईव्हीएम मशिनला दोष देतात.

आष्टी : ''पाच वर्षात सगळ्या समस्या सोडविल्याचा दावा नाही; परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षांच्या काळात केवळ 20 हजार कोटी दिले, तर आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत केली. अवर्षण, दुष्काळ, पूरपरिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून दिलासा दिला. भाजप सरकार आल्यापासून विकासकामांचा धडाका सुरू असून, आम्ही मराठवाडा वॉटरग्रीड सारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवून पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचीच सत्ता येईल,'' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची 'महाजनादेश यात्रा' सोमवारी (ता.26) जिल्ह्यात दाखल झाली. धामनगाव येथे स्वागतानंतर कडा येथे कॉर्नर सभा झाली. त्यानंतर आष्टी येथील सभेत फडणवीस मार्गदर्शन केले. पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, खासदार सुजय विखे, सुरजितसिंग ठाकूर, आमदार संगीता ठोंबरे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मुजोरी जनतेने विरोधकांना नापास केले. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी पेनला दोष देतो. त्याप्रमाणे ते ईव्हीएम मशिनला दोष देतात. सुप्रिया सुळे निवडून आल्या, तर ईव्हीएम चांगले, प्रीतम मुंडे निवडून आल्या तर ते वाईट असे कसे? असा सवालही त्यांनी केला. मात्र, आता ते 25 वर्षे सत्तेत येणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्याही यात्राही निघाल्या असल्या तरी जनतेशी संवादाऐवजी ते एकमेकांवरच हल्ला करत आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादीने पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात फक्त आश्वासने देऊन दिशाभूल केली. कृष्णा खोऱ्याचे पाणी स्वार्थासाठी आष्टी तालुक्याला मिळू दिले नाही. बीडचा 5 हजार कोटींचा आराखडा वॉटरग्रीडच्या माध्यमातून मंजूर करुन निविदाही काढली. 11 धरणे एकमेकांना जोडून पाईपलाईनद्वारे पाणी खेड्यापाड्यांत आणले जाईल. आतापर्यंत पाच वर्षात 30 हजार किलोमीटरचे रस्ते केले आहेत. तसेच 18 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे सांगत रस्ता चुकलेली राज्याची गाडी ट्रॅकवर आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

भरभरून जनादेश मिळेल : पंकजा मुंडे
विकासकामांच्या जोरावर भाजपची आगेकूच सुरू आहे. मोदी सरकार धडाडीने निर्णय घेत आहे. विरोधकांकडे कोणता मुद्दाच शिल्लक राहिला नसल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे. हे लक्षात आल्यामुळेच विरोधक आदळआपट करीत आहेत. 'महाजनादेश यात्रे'तून भाजप सरकारच्या झोळीत भरभरून जनादेश जनता देईल, असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis says that not all problems are solved but