मोठा हत्ती झाकायचा कसा, रेल्वे इंजिनचे करायचे काय? 

LokSabha elections
LokSabha elections

औरंगाबाद - निवडणूक कोणतीही असो, आचारसंहिता लागू झाली की, आचारसंहितेचा भंग पावणाऱ्या गोष्टी हटवण्यासाठी एकच पळापळ सुरू होते. तीच लगबग औरंगाबादेतही सुरू आहे; मात्र याचवेळी गंमतीशीर बाबी घडत आहेत. अहल्याबाई होळकर चौकात हत्तीचे तीन पुतळे आहेत. त्यातील दोन छोटे पुतळे झाकले असून, मोठा पुतळा तसाच आहे. रेल्वेस्टेशनवरील रेल्वेचीही तीच गत झाली आहे. 

निवडणुका जवळ आल्या की नेते, कार्यकर्ते जाहिरातबाजीसाठी पोस्टर्स, कटआऊट, बॅनर्सचा सहारा घेतात. यातून अनधिकृत बाबीही घडलेल्या असतात. स्थानिक राजकारणामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असते; मात्र जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा याच राजकारण्यांची पाचावर धारण बसते. हाच प्रकार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यावरही पाहायला मिळत आहे. 
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर रेल्वेस्टेशन रोडवरील अहल्याबाई होळकर चौकात महापालिकेच्या सौंदर्यबेटात हत्तीचे तीन पुतळे बसवले आहेत. पांढऱ्या कपड्याने दोन लहान हत्ती झाकले आहेत.

यावेळी संबंधितांना मोठा हत्ती झाकायचा कसा, असा प्रश्‍न पडला की काय, असेच चित्र दिसते आहे. छोटे हत्ती झाकले असून, मोठा हत्ती तसाच असल्याने हा प्रकार तिथून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. असाच प्रकार रेल्वेस्टेशनबाहेरील रेल्वे इंजिनबाबत घडला आहे. 

आचारसंहितेचा भंग पावतील अशा गोष्टी हटवण्यासाठी किंवा झाकण्यासाठी 24 तास, 48 तास आणि 72 तासांची मुदत संबंधित खासगी, शासकीय संस्थेच्या मालमत्ताधारकांना देण्यात येते. त्यावेळेत अंमलबजावणी न झाल्यास मोठ्या कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागते. हे ऐन निवडणुकीत परवडणारे नसल्याने कार्यकर्ते, नेतेमंडळींची तारांबळ उडते. सोशल मीडियावरही बंधने आणल्याने आधीच गोंधळ निर्माण झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com