थंडीच्या लाटेला धुक्‍याची साथ

थंडीच्या लाटेला धुक्‍याची साथ

औरंगाबाद - मागील आठवड्यात उत्तरेकडे थंडी व धुके होते. दरम्यान, फेमथाई वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर उत्तरेकडचे थंड वारे महाराष्ट्राकडे सरकले. आपल्या भागातील धूर आणि उत्तरेकडून आलेले थंड वारे यांच्या संमिश्र परिणामांनी सूर्यप्रकाश जमिनीवर पडल्यानंतर उष्णता (तापमान) वाढेपर्यंत हे धुके कायम राहते. तापमान वाढेल तसतसे धुके विरळ होते. धुके आणि थंडीची ही परिस्थिती आणखी आठ दिवस अशीच राहील, असे उदय देवळाणकर यांनी सांगितले. 

यंदा दुष्काळ असल्याने दवबिंदूचे प्रमाण कमी आहे; मात्र कमी तापमानामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता वाढते आणि वाढलेल्या घनतेमध्ये धूर व धूळ व अपारदर्शक बाष्प यामुळे काहीच दिसत नाही. तसेच अपारदर्शक चादर तयार झाल्याचा भास होतो. 

संक्रांतीनंतर सूर्याची लंब किरणे भारतीय उपखंडात पडायला सुरवात होते. त्यानंतर तापमान वाढत जाऊन धुके पडण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, संक्रांतीनंतर लगेचच थंडी हटेल असे नाही, तर उत्तरायण सुरू झाल्यानंतर भारतीय उपखंडातील थंडी कमी होऊन हळूहळू उन्हाळा सुरू होतो. साधारण महाशिवरात्रीनंतर थंडी राहते असा समज आहे; परंतु ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे थंडीच्या दिवसांत घट आढळून येत असल्याचेही श्री. देवळाणकर म्हणाले. 

भारतीय उपखंडातले तापमान वाढत जाते आणि दक्षिणायणात वेगवेगळी वादळे तयार होतात. सप्टेंबरअखेर आणि ऑक्‍टोबरच्या सुरवातीला मॉन्सूनचा प्रभाव कमी होतो आणि हवेचा दाब वाढायला सुरवात होते. मागच्या आठवड्यात फेमथाई नावाचे वादळ आले. चेन्नईच्या दक्षिण बाजूला चारशे किलोमीटर हे वादळ तयार झाले. आंध्र व उत्तर-पूर्वेला (बंगाल, बांगलादेश) निघून गेले. ज्यावेळेस असे वादळ वेगाने पुढे सरकते त्यावेळेस उच्च दाबाकडील वारे त्या दिशेने वाहायला सुरवात होते. यावेळेस उत्तरेकडे, महाराष्ट्रात, उत्तर कर्नाटकात, तेलंगणात हवेचा दाब वाढलेला असतो. 

...म्हणून धुके पसरते 
धुक्‍याचे कारण म्हणजे वाहनांच्या सायलेन्सरमधून येणारे प्रदूषण, धूर हे ढोबळमानाने सांगता येईल. दिवसभर वाफेचे उत्सर्जन सुरू असताना रात्रीचे तापमान कमी झाले की हे बाष्प पृथ्वीवर कोंडले जाते व दवबिंदूंच्या स्वरूपात बाहेर येते. हवेचे तापमान खूप कमी झाल्याने धूळ, धुराची घनता जास्त असते. त्यामुळे साहजिकच धूळ, धुराचे वजन वाढलेले असते. 

मोसंबी, मक्‍याची  घ्या काळजी 
अतिथंडीमुळे प्रकाश संश्‍लेषणाची (अन्न तयार करणे) क्रिया मंदावते. त्यामुळे रब्बी ज्वारीचे दाणे भरण्यासह, मका आणि केळीला समस्या उद्‌भवतात. तसेच मोसंबीला ताण बसण्याचा कालावधी वाढतो. याला पर्याय म्हणून मोसंबी, केळी बागांच्या परिसरात सायंकाळी शेकोट्या पेटवून धूप करावी. इतर पिकांना सकाळी, सायंकाळी तुषार सिंचनाने पाणी दिल्यास तापमानात समतोल राखता येतो, अशी माहिती राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. एस. बी. पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com