जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला आठ टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद - शहरातील कचराप्रश्‍न मार्गी लावा; अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी देताच संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच एक ट्रक आणि एक ट्रॅक्‍टर भरून आठ टन कचरा टाकून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.

औरंगाबाद - शहरातील कचराप्रश्‍न मार्गी लावा; अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी देताच संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच एक ट्रक आणि एक ट्रॅक्‍टर भरून आठ टन कचरा टाकून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.

येथील महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे; मात्र हा प्रश्‍न मार्गी लावण्याऐवजी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप करीत राजकारण करीत आहेत. दरम्यान, बुधवारी नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्‍तांसह भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात हा प्रश्‍न तातडीने मार्गी न लागल्यास महापालिका बरखास्त करण्याचा इशारा दिला. हा इशारा जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच आठ टन कचरा टाकत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुर्गंधीमुळे नाक दाबून काम
कचरा टाकल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल बांधूनच काम करावे लागले.

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली, तरी कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावणे हे प्रशासनाचे काम आहे. नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसेकर यांनी येथे भेट देऊन दहा दिवसांत कचराकोंडी फोडण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र प्रशासनाने वेळकाढूपणा दाखविला. जनतेच्या प्रश्‍नांवर आम्ही शांत बसणार नाही. हा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आणखी कचरा आणून टाकू.
- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई - जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकल्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत ही घटना अत्यंत लांच्छनास्पद असून, याचा प्रशासनातर्फे निषेध करीत असल्याचे म्हटले.

'राष्ट्रध्वजासमोर अशा पद्धतीने कचरा आणून टाकणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून, कचरा टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. आपले म्हणणे लोकशाही पद्धतीने मांडणे योग्य आहे; परंतु अशा कृतीवरून वैचारिक पातळी लक्षात येते. याप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा अवमान, तसेच सार्वजनिक ठिकाणी बळजबरीने प्रवेश यासंबंधी गुन्हे दाखल करण्यात येतील.''

Web Title: collector office garbage agitation